सायमन मार्टिन हे प्रसिद्ध कवी असून सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. मार्टिन यांचे सात कविता संग्रह, दोन ललितलेख संग्रह तसेच एक अनुवाद प्रकाशित झालेले आहेत. शालेय पाठय़पुस्तकातही त्यांच्या कवितांचा समावेश आहे. सुवार्ता मासिकाचे ते गेल्या २५ वर्षांपासून सहसंपादक आहेत. सहयोग संस्थेत संचालक म्हणून ते पूर्णवेळ काम करतात.

माझा जन्म शेतकरी कुटुंबातला त्यामुळे वाचनाचा किंवा साहित्याचा वारसा आणि पाश्र्वभूमी असण्याचा प्रश्नच नव्हता. आठवीत असताना मी शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कांदबरी वाचून काढली. तेव्हा त्यातलं फारसं समजलं नाही पण तेव्हापासून कर्ण माझा आवडता नायक झाला. तेव्हापासून खऱ्या अर्थाने वाचनाशी नाळ जोडली गेली. महाविद्यालयात असताना प्रा. रमेश कुबल यांना काय आणि कसं वाचायचं याबाबत विचारणा केली असता त्यांनी मला वाचत राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, वाचनातून तुला जीवनाची दिशा मिळत राहील. त्यांच्या सांगण्याप्रमाणे, मी वेडय़ासारखा वाचत राहिलो. मराठी, हिंदीबरोबरच इंग्रजी साहित्याचेही वाचन करू लागलो. जगभरातील विविध भाषांमधील अनुवादित साहित्य वाचू लागलो. वाचनातून विविध विषयांशी ओळख वाढत गेली. साहित्यात चांगलं वाईट असं काहीच नसतं. साहित्य हे साहित्य असतं. हे यानिमित्ताने उमजू लागले. इस्टरच्या रात्री चर्चच्या आवारात असताना अचानक कवितेबरोबर माझी गाठभेट झाली. कविता आणि चळवळीमध्ये एकत्र सहभागी झालो.

raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
shivraj patil chakurkar, Dr archana patil chakurkar, latur, amit deshmukh, congress, bjp
शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक आनंदी
AAP workers attempt to enter Nitin Gadkaris campaign office in Nagpur
नागपुरात गडकरींच्या प्रचार कार्यालयात शिरण्याचा आप कार्यकर्त्यांचा प्रयत्न
suspense continues over vijay wadettiwar and mla pratibha dhanorkar for lok sabha candidate for chandrapur
विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर? सस्पेन्स कायम; तेली समाजापाठोपाठ कुणबी समाजाचाही इशारा

वाचनाच्या प्रवासात विविधांगी वाचन करत गेलो. बाबा कदम यांच्या सर्व कादंबऱ्यांची मी पारायणे केली. एकदा कोल्हापूरला बाबा कदम यांच्या घरी जाण्याचा योग आला त्यावेळी त्यांच्या सर्व कादंबऱ्यांची नावे एका दमात सांगितली. ऐकून तेही अवाक्  झाले. आयुष्यात शब्द नसतील तर आनंद नाही. त्याच स्वर्गीय आनंदासाठी पुस्तकं माझ्यासाठी जीव की प्राण झाली. कवितांमुळे माणसं जोडत गेलो तर पुस्तकांमुळे भाषाप्रेमी झालो. माझ्या कवितांमधला पन्नास टक्के उगम हा येशू आहे. बायबलने मला अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा दिली. बायबलच्या वाचनामुळे मी लढवय्या बनत गेलो. साहित्य हे गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी आहे असं मला वाटतं.

वाचनातून अनेक जण माझ्या मनात वसत गेले. संत पॉल, हरमस हेस, संत तुकाराम, बहिणाबाई, फादर वालेस, चंद्रकांत देवताले, जयप्रकाश, ग्रेस, तेहार्दे शारदेन, रिचर्ड बाख हे माझे सोयरे झाले. मी त्यांना आपलं म्हटलं आणि त्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतलं. संपूर्ण आयुष्यच पुस्तक आणि शब्दमय झालं. घराला कवितेचा चेहरा मिळाला. याच घरात शिवाजी सावंत, माधव गडकरी, अभय बंग, अनिल अवचट, उत्तम कांबळे, लता राजे, अच्युत गोडबोले, ना.धों. महानोर, नारायण सुर्वे, शंकर वैद्य, रावसाहेब कसबे, रंगनाथ पाठारे आदी मंडळी सोयरे म्हणून राहून गेली. या पुस्तकांमुळेच मला अस्तित्व प्राप्त झालं आहे.

सध्या मी गौतम बुद्धांच्या जीवनावरील पुस्तकं वाचतोय. तुकाराम मी पुन्हा पुन्हा वाचत असतो. जगभरातील भारतीय भाषेत अनुवादित झालेली साहित्य कलाकृती वाचत असतो. मला ओशोंनी लिहिलेलं साहित्य वाचायला फार आवडतं. ओशोंची सर्वच मतं मला पटत नाहीत, पण आध्यात्मिक वाचन करायचं असेल तर मी ओशोंच्या साहित्याकडे वळतो. गंभीर वाचन करायचं असेल तेव्हा जे. कृष्णमूर्ती यांचं भारतीय तत्त्वज्ञानावरील लिखाण वाचत असतो. हिंदीतले चंद्रकात देवताले, सर्वेश्वर दयाळ सक्सेना, मंगेश डबराल, अरुण कमल, कुमार अंबूज, अशोक वाजपेयी  माझ्या जीवनावर प्रभाव टाकणारे कवी आणि लेखक आहेत.

माझ्या घरात आणि सहयोग केंद्रात दहा ते पंधरा हजार पुस्तकांचा संग्रह आहे. सहयोग केंद्राचा पहिला माळा पुस्तकांनी भरला आहे. कवितांवरील पुस्तकेही जास्त आहेत. विविध प्रकारचे साहित्य वाचण्यावर माझा भर असतो.

वाचन करण्याची माझी वेगळी पद्धत आहे. मी स्वत:ला तीन तीन दिवस एका खोलीत कोंडून घेतो. भुईगावच्या सहयोग केंद्रात शांत जागा आहे. मी दर महिन्यातील किमान दोन दिवस स्वत:ला त्यात कोंडून घेतो आणि वाचन करतो. पूर्वी चार चार दिवस अशा पद्धतीने वाचन करायचो. आता मात्र हा काळ महिन्यातून दोन दिवसांवर आला असला तरी या काळात मी जगात कुणाचाच नसतो. या काळात गंभीर वाचन होतं. मी शब्दांच्या जवळ जातो. त्यासाठी वेळेची अडचण मला कधीच भासत नाही.

शब्दांकन – सुहास बिऱ्हाडे