शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा डोंबिवली यांच्या वतीने ज्ञानेश्वर मंगल कार्यालय येथे डोंबिवली भूषण व याज्ञवल्क्यपुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदा ज्येष्ठ गायक व संगीतकार वसंत आजगांवकर यांना डोंबिवली भूषण पुरस्कार व सामाजिक कार्यकर्ते व नागपूर येथील ज्येष्ठ स्वशाखीय गोिवदराव पत्राळे यांना याज्ञवल्क्य पुरस्कार सखाराम महाराज अमळनेर व ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी जयकृष्ण सप्तर्षी, मुकुंद पाठक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून प्रेरणा मिळत गेल्याने आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे, अशी प्रतिक्रिया वसंत आजगांवकर यांनी व्यक्त केली तर पत्राळे यांनी हा पुरस्कार वेद माऊलीला मिळाला, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. सुधीर जोगळेकर यांनी आपल्या भाषणात पाश्चात्त्य आणि भारतीय संस्कृतीचा दृष्टिकोन यातील फरक स्पष्ट करून दाखविला.
पुस्तक महोत्सव
शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या वतीने पुस्तकप्रेमींसाठी भव्य पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात कथा कादंबरी, ग्रंथ, बालवाङ्मय आदी विविध पुस्तकांचा समावेश आहे. ३१ एप्रिलपर्यंत शिवसेना मध्यवर्ती शाखा, शिवाजी पुतळ्याजवळ, डोंबिवली (पू.) येथे सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत महोत्सव खुला आहे. पुस्तके ५० रुपयांत उपलब्ध होतील. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरी यांनी हे प्रदर्शन भरविले आहे.   
लसीकरणासाठी इंद्रधनुष्य अभियान
गरीब व गरजू वर्गातील १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना व गरोदर मातांना आवश्यक लसी इंद्रधनुष्य अभियानाअंतर्गत मोफत दिल्या जाणार आहेत. हे अभियान एप्रिल ते जुलै या महिन्यात प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात राबविल्या जाणार आहेत. गरजू नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले .
नवजात बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा जास्त प्रमाणात आजारी पडतात किंवा मृत्यू पावत असल्याचे दिसून आले आहे. सरकारी लसीकरण मोहीमेच्या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे हे अभियान राबविण्यात येत आहे.
कुष्ठरुग्ण वसाहतीत दाखल्यांचे वाटप
कुष्ठ रुग्णांना शासनाच्या विविध योजनांचा अनेकदा लाभ घेता येत नाही. त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी कल्याण तहसील कार्यालयाने दाखले वाटप मोहीम कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत राबवून त्यांना घरपोच दाखले मिळतील, अशी सोय केली. राज्यात प्रथमच अशा योजनेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी तहसील कार्यालयाने सुमारे १७२ जणांना दाखल्यांचे वाटप केले.
कल्याण येथील हनुमाननगर कुष्ठरुग्ण वसाहत येथे दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हनुमाननगर कुष्ठरोग वसाहतीचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड आणि कुष्ठरुग्ण मित्र गजानन माने यांनी दाखले वाटप शिबीर व्हावे अशी मागणी केली होती. राज्यात कुष्ठरुग्णांच्या ३६ वसाहती असून प्रथमच कुष्ठरुग्ण वसाहतीमध्ये दाखले वाटप शिबीर राबविण्यात आले होते. यावेळी प्रांत अधिकारी धनंजय सावळकर, कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे, प्रशांत पानवेकर, अभिजीत देशमुख उपस्थित होते.