ठाण्यातील ‘ग्रंथकट्टा’ कार्यक्रमात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे प्रतिपादन

साहित्य संमेलनाला गर्दी कमी असण्याचे कारण साहित्यिक आहेत. जगण्याच्या बदलाविषयी साहित्यात प्रतिबिंब दिसायला हवे. स्मृतिरंजनाच्या पलीकडे जात जगण्याशी संबंध ठेवणारे लिखाण मराठी साहित्यात होणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘ग्रंथकट्टा’ या कार्यक्रमात केले.

‘ठाणे आर्टिस्ट गिल्ड’ आणि गडकरी कट्टा यांच्या वतीने ‘ग्रंथगंध’ उपक्रमाच्या अंतर्गत गडकरी रंगायतनच्या लॉनवर झालेल्या मुलाखतीत निखिल बल्लाळ यांनी गिरीश कुबेर यांच्याशी संवाद साधला.

‘मराठी साहित्यात कालसापेक्षतेची उणीव जाणवते. साहित्यिकांनी काळाप्रमाणे बदलत लोकांना वाचायला आवडेल, असे लिखाण मराठी साहित्यात व्हायला हवे. मराठी साहित्यात उत्कृष्ट शब्द निर्माण झालेले नाहीत. काळ बदलला तरी मराठी साहित्यात वाङ्मय पूर्वीचे राहिल्याने साहित्यिक तुटलेपण आलेले आहे. अन्य भाषेत असे साहित्यिक तुटलेपण नसल्याने ‘रेक्ता’सारख्या उर्दू कवी संमेलनाला तरुणांची गर्दी होते, असे ते म्हणाले. उत्तम साहित्यिक वा कलाकार राजकीय भान असलेला असतो. दुर्दैवाने मराठी साहित्यिक व्यवस्थेविषयी कोणतीही भूमिका घेताना दिसत नाहीत. दुर्गाबाई भागवत, नरहर कुरुंदकर, विजय तेंडुलकर यांच्यानंतर लेखकांनी एखाद्या गोष्टीविषयी ठाम भूमिका घेणे थांबवलेले आहे. जगातील उत्तम वाङ्मय राजकीय भूमिका असलेले असते. पूर्वी मराठी साहित्यात राजकीय भूमिका घेतली जात होती, असे ते म्हणाले. जगात काहीतरी प्रचंड घडतंय हे समाजात सांगायला हवे, या प्रेरणेतून माझे लिखाण होत गेले, असे सांगताना मराठी साहित्यात सोपे लिखाण व्हायला हवे. अभिजात इंग्रजी वाङ्मयात ऑस्कर वाइल्ड, जॉर्ज ऑर्वेल, थॉमस फ्रिडमन या साहित्यिकांनी सोपे लिखाण केलेले आहे. या प्रेरणेतून अभ्यास करून मराठी भाषेत लिखाण केल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक वर्षांनंतरही लिखाणाचा संदर्भ निघायला हवा. अशा प्रकारचा ऐवज लिखाणातून तयार होणे अपेक्षित असते. दुर्दैवाने मराठीत संयुक्त महाराष्ट्र चळवळ, साखर कारखाने या विषयावर उत्तम लिखाण झालेले नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले. ‘मराठी भाषिकांनी इंग्रजीविषयी मनात गंड ठेवता कामा नये. या गंडामुळे मराठी माणसे स्वत:ची ओळख विसरतात. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा पूर्ण येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. समाजमाध्यमांत व्यक्त होता येते; मात्र त्यातून काही विशेष साध्य होत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. गोंविदराव तळवळकर यांचा विद्यार्थी असल्याने वाऱ्याच्या उलट दिशेने जाण्याची शिकवण त्यांनी कायम दिली, असेही ते म्हणाले.