मुंबईतील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी ठाण्याहून शरीरातील एक अवयव शुक्रवारी दुपारी रुग्णवाहिका आणि रेल्वेने नेण्यात आला. ठाणे ते परळपर्यंतचा ५० मिनिटांत प्रवास पूर्ण करून अवयव रुग्णालयात पोहोचविण्यात आला असून पहिल्यांदाच रेल्वेने अशा प्रकारे अवयवाची वाहतूक करण्यात आल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

ठाण्यातील एक ५३ वर्षीय व्यक्ती अपघातात गंभीर जखमी झाली होता. ज्युपिटर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्याचा ब्रेन डेड झाल्याचे घोषित केले होते. त्याने यापूर्वी अवयवदानासाठी नोंदणी केली होती. तो मृत पावल्यानंतर कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या मदतीने त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी दुपारी त्याचे यकृत परळच्या ग्लोबल रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. ज्युपिटर रुग्णालय ते ठाणे स्थानकापर्यंत सात मिनिटांत रुग्णवाहिकेतून यकृत नेण्यात आले. त्यानंतर ठाणे ते दादपर्यंत लोकलने २५ मिनिटांत यकृत नेण्यात आले. दादर स्थानकातून रुग्णालयापर्यंत सात मिनिटांत नेण्यात आले. या ग्रीन कॉरिडोरसाठी ठाणे पोलीस आणि रेल्वे पोलिसांची मदत घेण्यात आली.