बदलापुरात सध्या महावितरण कंपनीकडून दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमन सुरू करण्यात आले असून चार ते पाच तास विजेचा पुरवठा पुढील दोन ते तीन शुक्रवार तरी बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी नऊपासून गेलेली बदलापुरातील वीज ही थेट दुपारी पावणेतीन वाजताच आली. तसेच असा वीजपुरवठा खंडित होणार असल्याबद्दल नागरिकांमध्ये अनभिज्ञता होती. त्यामुळे अनेक नागरिक वीज गेल्याने बुचकळ्यात पडले होते. बऱ्याच जणांची कामेही खोळंबून पडली होती. तर अनेकांना वाढत्या उकाडय़ातही वीज गेल्याने घामाच्या धारांचा सामना करावा लागला. दरम्यान, गेले महिनाभर बदलापूर पूर्व व पश्चिम भागात दिवसभरात कोणत्याही वेळी विजेचा लपंडाव चालू असल्याचे प्रकार घडले आहेत.बदलापुरात सध्या निवडणुकांचे वातावरण असून अनेक उमेदवार प्रचार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करत आहेत. परंतु वीज गेल्याने त्यांची ही कामे शुक्रवारी सकाळी ठप्प झाली. तर, त्यांच्या प्रचार कार्यालयांमधील वीज गेल्याने प्रचार कार्यालयात देखील शुकशुकाट होता.

मान्सूनच्या तयारीसाठी वीज बंद
बदलापुरात विजेचे भारनियमन सुरू केलेले नसून पावसाळ्यापूर्वी विजेच्या तारांची व तत्सम कामांची दुरुस्ती व्हावी यासाठी अंबरनाथ येथून शुक्रवारी काही तासांसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. तसेच ही सर्व दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावीत या हेतूने पुढील दोन ते तीन शुक्रवार काही तासांसाठी वीजपुरवठा बंद राहील असे बदलापूर पश्चिमचे उप अभियंता बोके यांनी स्पष्ट केले.