X

वेळीअवेळी ‘बत्ती गुल’

कोळशाच्या तुटवडय़ामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

ठाण्यात वेळापत्रकाविना भारनियमन सुरू; ‘ऑक्टोबर हीटमध्ये ठाणेकरांचे हाल

ऑक्टोबर सुरू होताच पस्तिशीपार चढलेल्या पाऱ्यामुळे एकीकडे जीव हैराण झाला असतानाच, महावितरणने सुरू केलेल्या भारनियमनामुळे ठाणेकर हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, राज्यभर राबवण्यात येत असलेल्या भारनियमनासाठी ठिकठिकाणी वेळापत्रक जारी करण्यात आले असले तरी, ठाण्यात मात्र कोणत्याही वेळी कोणत्याही विभागाचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. ज्या भागात विजेचा भार अधिक प्रमाणात असेल, त्या परिसरातील वीजप्रवाह खंडित करण्याचा अजब निर्णय महावितरणने घेतल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

कोळशाच्या तुटवडय़ामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून महावितरणविषयी ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. सातत्याने सव्‍‌र्हर डाउन होत असल्याने नागरिकांना वीज बिल भरण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. वापरापेक्षा अधिक बिल पाठविल्याने अनेक वीजग्राहक हैराण आहेत. त्यात भारनियमनचा शॉक महावितरणने दिला आहे.

ठाणे क्षेत्रात २९.५ कोटी युनिट इतक्या प्रचंड प्रमाणात वीजपुरवठा केला जातो.  सध्या वीज टंचाईमुळे ज्या भागात विजेचा दाब अधिक येईल, त्या भागात त्या क्षणी वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. तसेच महावितरणकडून भारनियमनाचे कोणतेही वेळापत्रक ठरलेले नाही, अशी माहिती महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. शहरातील नौपाडा, घोडबंदर, चरई, खोपट, रेल्वे स्थानक परिसरात विजेचा अधिक वापर होतो. त्यामुळे या परिसराला भारनियमनाचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. एक प्रकारे अप्रत्यक्षरीत्या वीज वापरावरच महावितरणने र्निबध घातल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे.

महावितरणच्या या नव्या फतव्यामुळे नौपाडा, पाचपाखाडी या ठाण्यातील व्यावसायिक केंद्रांना वीज भारनियमनाचा अधिक प्रमाणात त्रास होण्याची शक्यता आहे. बुधवारी नौपाडा भागात सायंकाळी सातच्या सुमारास सुमारे दोन तास भारनियमन करण्यात आले होते.  हे भारनियमन तात्पुरत्या स्वरूपात असणार असून ते टप्प्या-टप्प्यात होणार असल्याचे महावितण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.  दुसरीकडे, वीजचोरी व वीज बिल थकबाकी जास्त असलेल्या मुंब्रा, कळवा आणि दिवा या भागांतही भारनियमन जास्त वेळ असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी सहा तास वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वेळापत्रकाची मागणी

ठाणे शहर हे ‘अ’ वर्गात मोडते. त्यासाठी शहरवासीयांकडून जादा दराने वीज बिल वसूल केले जाते. भारनियमनमुक्तीसाठी ती किंमत मोजूनही शहरात भारनियमन कशासाठी,  तसेच भारनियमनाचे निश्चित वेळापत्रक का दिले जात नाही, असा सवाल  द्विजेंद्र केणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दाद मागितली आहे.

Outbrain