08 March 2021

News Flash

अटीतटीच्या लढतीत तिघांची मतदानाला दांडी

ठाणे आणि पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेच्या एका जागेसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले

ठाणे आणि पालघर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
ठाणे आणि पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेच्या एका जागेसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले असून त्यामध्ये १०६० पैकी १०५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. काँग्रेसच्या दोन आणि बाविआच्या एका मतदाराने मतदान केले नसल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांच्या पारडय़ातील तीन मते कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेनेचे उमेदवार रविंद्र फाटक आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावरखरे या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य मतपेटी बंद झाले असून येत्या ६ जूनला मतमोजणी होणार आहे.
विधान परिषदेच्या निवडणूकीत विजय मिळविण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी मतदारांची जुळवाजुळव सुरू केली होती. तसेच मतदारांना आपल्या बाजुने वळविण्यासाठी दोन्ही उमेदवारांमध्ये स्पर्धा लागल्याने मतदारांचे महत्व वाढले होते. फोडाफोडीच्या राजकारणामुळे मते फुटण्याची भिती व्यक्त होऊ लागली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही उमेदवारांच्या पक्षाने मतदारांना गुप्त ठिकाणी ठेवले होते. शुक्रवारी सकाळी या मतदारांना मतदान केंद्रांवर बसमधून आणण्यात आले. त्यानंतर मतदान केंद्रांवर रांगा लागून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणूकीसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ात १३ ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या मतदार संघात एकूण ५३९ महिला तर ५२१ पुरुष असे एकूण १०६० मतदार आहेत. त्यापैकी ५३८ महिला तर ५१९ पुरुष अशा १०५७ मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे ९९.७२ टक्के इतके मतदान झाले आहे.
ठाणे आणि पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरीषद मतदार संघातून वसंत डावखरे हे यापुर्वी चारवेळा निवडूण आले असून या मतदार संघातून ते आता पाचव्यांदा निवडणूक लढवित आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार रविंद्र फाटक हे या मतदार संघातून डावखरे यांच्यासमोर दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. पहिल्या निवडणूकीत फाटक यांचा पराभव झाला होता. शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असली तरी या निवडणूकीच्या निमित्ताने मात्र दोघेही एकत्र आल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे दोन्ही काँग्रेसनी एकत्र येऊन ही निवडणूक लढविली आहे. एकंदरीतच शिवसेना-भाजप महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.

आघाडीची तीन मते घटली?
ठाणे विधान परिषद निवडणूकीत दोन्ही उमेदवारांसाठी एक-एक मतदार महत्वाचा मानला जात आहे. वसई, उल्हासनगर आणि अंबरनाथ भागातील तीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नसून त्यामध्ये दोन काँग्रेस आणि एक बाविआचे नगरसेवक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 12:38 am

Web Title: local bodies elections in thane and palghar
टॅग : Elections
Next Stories
1 दोन कोटीच्या मालमत्ता १ रुपयात खरेदी
2 ठाणे विधान परिषदेसाठी ९९ टक्के मतदान; कोण बाजी मारणार, डावखरे की फाटक?
3 विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकाला मध्य रेल्वेची सशर्त मंजुरी
Just Now!
X