News Flash

वडोदरा महामार्गाचे सर्वेक्षण बंद पाडले

शेतकऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांशी संपर्क करून आपल्या तक्रारी आणि मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या.

बाजारभावाने मोबदला मिळण्यावर शेतकरी ठाम
जवाहरलाल नेहरू बंदर ते वडोदरा महामार्गासाठी जमीन हस्तांतरण करण्यासाठी शासनाकडून सुरू झालेल्या सर्वेक्षणाचे काम स्थानिक शेतकऱ्यांनी मंगळवारी बंद पाडले. जोपर्यंत आमच्या जमीनींना योग्य मोबदला जाहीर केला जात नाही तोपर्यंत सर्वेक्षण केले जाऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतल्यामुळे या महामार्गाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महामार्गाचा काही भाग अंबरनाथ तालुक्यातील अनेक छोटय़ा मोठय़ा गावांतून जातो आहे. त्यामुळे येथील शेकडो हेक्टर जमीनीचे संपादन केले जाणार असून त्यासाठी येथील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता थेट नोटीसा पाठवल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांशी संपर्क करून आपल्या तक्रारी आणि मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या. यावर योग्य निर्णय घेऊ न शेतकऱ्यांना मोबदल्याबाबत विचार केला जाईल असे आश्वसन यावेळी देण्यात आले. त्यानंतर यावर कारवाई थांबेल अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र मंगळवारी अचानक भोज गावाजवळ भूमीलेखा विभाग, महामार्ग प्राधिकरण यांनी थेट सर्वेक्षण सुरू केल्याने स्थानिकांनी त्यांना विरोध केला आणि काम बंद पाडले, अशी माहिती ग्रामस्थ रोहिदास भोईर यांनी दिली.
संपादित केल्या जाणाऱ्या जमिनी या बदलापूर जवळील दहा गावांतील आहेत. यातील अनेक गावांचे प्रस्तावित महापालिकांसाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात ही गावे पालिकेत समाविष्ट होऊ शकतात. त्यामुळे येथील जमीनींचे दर वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी सध्याच्या कवडीमोल रेडी रेकनर दराने जमीनी घेऊ न सरकार आमची फसवणूक करत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे बाजारभावानुसार जमीनींचा मोबदला जाहिर केल्यानंतर सर्वेक्षणाचे काम करू दिले जाईल, असे म्हणणे यावेळी ग्रामस्थांना अधिकाऱ्यांपुढे मांडले.

सर्वेक्षणपूर्व मोबदला जाहीर करण्याची मागणी नियमबाह्य़ आहे. सर्वेक्षण करण्यापूर्वीच मोबदला जाहीर होणे कायद्याशी विसंगत आहे. काम सुरु करण्यापुर्वी आणि जमिनीचे संपादन करण्यापूर्वी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल. सध्या सर्वेक्षण थांबवले असले तरी पुढे नियोजन करून पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण पार पाडले जाईल.
– बी. जी. गावंडे, प्रांत अधिकारी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 3:57 am

Web Title: local farmers stopped vadodara highway survey
Next Stories
1 भिवंडी, मुरबाडमध्ये शिधावाटप दुकानदारांवर गुन्हे दाखल
2 कल्याण कचराभूमीला भीषण आग
3 वसईत स्लॅब कोसळून २५ प्रवासी नाल्यात
Just Now!
X