कुमार आयलानींची स्पष्टोक्ती

उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर माजी आमदार पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी याला कोणत्याही परिस्थितीत पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार कुमार आयलानी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मांडली. येत्या दोन दिवसांत ओमी यांचा भाजप प्रवेश ठरला असल्याची चर्चा सध्या उल्हासनगरात सुरू आहे. या चर्चेचे खंडन करताना असा कोणताही प्रवेश होणार नाही, असा दावा आयलानी यांनी केला.

उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना ओमी कलानी यांना भाजपप्रवेश देण्यात येण्याच्या चर्चेने सध्या जोर धरला आहे. उल्हासनगरात पप्पू कलानी यांच्या साम्राज्याला धक्का देत पाच वर्षांपूर्वी भाजपचे आयलानी यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर महापालिका निवडणुकीतही शिवसेना-भाजपने आरपीआयच्या साथीने पप्पू समर्थकांचा धुव्वा उडविला. असे असले तरी दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र पप्पू यांच्या पत्नी ज्योती यांनी आयलानी यांचा पराभव करीत भाजपला धक्का दिला. नरेंद्र मोदी यांची जोरदार हवा असतानाही सिंधी कार्डचा पुरेपूर वापर करीत कलानी यांनी भाजपला चीतपट केल्याने यंदाही महापालिका निवडणूक भाजप आणि कलानी या दोघांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून पप्पू यांचा मुलगा ओमी भाजपप्रवेश करीत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. यंदा उल्हासनगरात भाजपने कलानी कुटुंबीयांसह शिवसेनेसोबतही दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेसोबत युतीची चर्चा सुरू असली तरी एकटय़ाने निवडणूक लढण्याची चाचपणी भाजप करीत आहेत. त्यामुळे ओमी यांना पक्षात घेऊन पावन करण्यात येईल, अशी चर्चा सुरू आहे.

भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ओमी यांच्या प्रवेशास विरोध असल्याचे सोमवारी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे.

रिपब्लिकन पक्षाला १२ जागा जाहीर

भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत यासंबंधी आपण वरिष्ठांसोबत बोललो असून त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ओमी यांच्या प्रवेशाची कोणतीही शक्यता नसल्याचे  स्पष्ट केले. दरम्यान, आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२ जागा दिल्याची घोषणा करताना ओमी कलानीचे प्रभाव क्षेत्र असलेल्या जागा त्यांच्या प्रवेशापूर्वीच जाहीर करून त्यांची कोंडी केली.