उन्हाच्या काहिलीमुळे आधीच जीव नकोसा झालेल्या रेल्वे प्रवाशांसाठी शुक्रवारचा दिवस फरफट करणारा ठरला. उन्हाचे चटके सहन करून कार्यालय गाठण्याच्या गडबडीत घराबाहेर पडलेल्यांना ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान झालेल्या रेल्वेच्या तांत्रिक बिघाडाने रोखले. लोकल विस्कळीत झाल्यामुळे खोळंबलेल्या प्रवाशांनी मग भर उन्हातच रुळांवरून पुढचा प्रवास सुरू केला. तर दुसरीकडे या परिस्थितीचा गैरफायदा घेत रिक्षाचालकांनीही कळवा ते ठाणे या अंतराकरिता प्रत्येकी ५० ते ७० रुपये आकारत प्रवाशांची अक्षरश: लूट केली.  
मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेसेवेचा मार्ग शुक्रवारी तांत्रिक बिघाडामुळे ठप्प होऊन पडला होता. एकाच वेळी जलद आणि धिम्या मार्गावर उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे सुमारे दीड तास रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती. याचा फटका सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना बसला. ठाणे येथे तांत्रिक बिघाड झाला असतानाच कळवा रेल्वेस्थानकाजवळही यंत्रणेत दोष निर्माण झाल्याने प्रवाशांची दुहेरी कोंडी झाली. तप्त उन्हाचे चटके बसत असतानाही मध्येच अडकलेल्या गाडय़ांतील प्रवाशांनी रुळांवरून पायपीट सुरू केली. नजीकचे स्टेशन गाठून तेथून पुढे मार्गस्थ होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना रिक्षाचालकांनीही लुबाडले. एकेका प्रवाशाकडून ५० ते ७० रुपये आकारले जात होते व एका रिक्षात पाच-सहा प्रवासी कोंबले जात होते. कळव्याहून ठाण्याला सोडण्यासाठीचे हे भाडे घेणाऱ्या अनेक रिक्षाचालकांनी ‘पुढे वाहतूक कोंडी आहे’ असे कारण सांगत अनेक प्रवाशांना अध्र्या वाटेवरच सोडले. या सगळय़ा गोंधळामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा प्रवाशांना वाऱ्यावर सोडले. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल किंवा शहर पोलीस नसल्याने रिक्षाचालकांची मनमानी सुरूच होती, अशी माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे जितेंद्र विशे यांनी दिली.

तप्त उन्हाचा तडाखा
रेल्वे खोळंबल्याने जवळच्या स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी प्रवाशांनी गाडीतून रुळावर उडय़ा घेऊन रुळावरून चालण्यास सुरुवात केली. मात्र रखरखत्या उन्हामुळे प्रवाशांना ग्लानी येणे, उलटी होणे असे प्रकार घडत होते. यात महिलांची संख्या जास्त होती. अनेक ठिकाणी प्रवासीच एकमेकांना पाणी देताना दिसत होते. मात्र येथेही रेल्वेची यंत्रणा किंवा प्रवासी संघटना प्रवाशांच्या मदतीला धावली नाही.

विद्यार्थ्यांना फटका
मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाच्या परीक्षा सुरू असून बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव, वासिंद या कल्याणपलीकडच्या भागातून मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी ठाण्याच्या दिशेने रेल्वे प्रवास करत होते. मात्र कळव्यातच गाडी अडकून पडल्यानंतर पेपरला कसे जायचे, हा प्रश्न त्यांना पडला होता.