पश्चिम रेल्वे प्रशासनाचा निर्णय; प्रवाशांना दिलासा मिळणार

डहाणू ते वैतरणा दरम्यान चार फेऱ्यांची वाढ करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सकाळच्या वेळी चर्चगेटहून, दुपारी विरारहून डहाणूकडे जाण्यासाठी आणि मुंबईकडे जाण्यासाठी डहाणूहून दुपारची आणि सायंकाळची अशा चार फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

डहाणू ते वैतरणादरम्यान फेऱ्या वाढविण्यासाठी दीड वर्षांपासून डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था पाठपुरावा करीत आली आहे. संस्थेच्या शिष्टमंडळाने दिलेल्या या मागण्यांसाठी  संस्थेच्या शिष्टमंडळाने चर्चगेट येथे रेल्वे अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. गर्दीच्या वेळी आणि गर्दीच्या बाजूने डहाणू ते वैतरणा दरम्यान उपनगरीय गाडय़ा वाढविणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य असल्याचे अगदी तपशिलासकट रेल्वे अधिकाऱ्यांना वेळोवेळी  समजावून सांगण्यात आले. यासंदर्भातील लेखी अर्ज अधिकाऱ्यांना वेळोवेळी देण्यात आले होते. उपनगरीय गाडय़ा वाढविण्यासोबतच शिष्टमंडळाने लांबपल्ल्याच्या गाडय़ांना पालघर स्थानकात थांबा देणे शक्य असल्याचे सांगून त्या आशयाचे निवेदनही रेल्वे अधिकाऱ्यांना सुपूर्द केले आहे.

तारापूर एमआयडीसीमध्ये दुसऱ्या पाळीत काम करणाऱ्या कामगारांसाठी डहाणूवरून एक ईएमयू गाडी सुरू करणे शक्य असल्याचे सांगतानाच प्रवाशांना होणारी अडचण आणि सर्व तांत्रिक निकषांसह त्या गाडीचा प्रस्तावच शिष्टमंडळाने रेल्वे ठेवला आहे. डहाणूकडे जाण्यासाठी सकाळी ९:०० वाजता चर्चगेटहून आणि ३ वाजून ४५ मिनिटांनी विरारहून दोन फेऱ्या आणि मुंबईकडे जाण्यासाठी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी आणि संध्याकाळी ४: ०५ मिनिटांनी डहाणूहून दोन फेऱ्या अशा एकूण चार फेऱ्या असतील.