करोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात काही शहरातील लॉकडाउनचा कालावधी संपला आहे. तर काही शहरांमध्ये लॉकडाउन अजूनही लॉकडाउन सुरूच आहे. दरम्यान, कल्याण डोबिंवली महापालिके पाठोपाठ नवी मुंबईतील लॉकडाउनचा कालावधी संपला असून, महापालिकेनं हॉटस्पॉट असलेल्या भागातील लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढविला आहे.

राज्यातील करोना संकट अजूनही टळलेलं नाही. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा विचार करून विविध शहरातील महापालिका आयुक्तांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. नवी मुंबई महापालिकेनं सुरूवातीला १३ जुलैपर्यंत लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लॉकडाउन १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला होता.

आज (१९ जुलै) मध्यरात्री लॉकडाउनचा कालावधी संपत असून, महापालिकेनं त्यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी लॉकडाउन शिथिल करत असल्याचे आदेश काढला आहे. मात्र, यातून नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट वगळण्यात आले आहे. हॉटस्पॉट क्षेत्रात करोनाचा धोका कायम असल्यानं ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.

कल्याण-डोबिंवली महापालिकेनंही हॉटस्पॉटमधील लॉकडाउन वाढवला

कल्याण डोबिंवली महापालिका क्षेत्रात सुरूवातीला २ ते १२ जुलै या कालावाधीत कल्याण डोंबिवलीत लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. सकाळी ७ ते १० या वेळेत दुधाची डेअरी, किराणा सामान आणि मेडिकल सुरु ठेवण्यात आली होती. तर मेडिकलची वेळ संध्याकाळी ७ पर्यंत करण्यात आली होती. त्यानंतर संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन १२ जुलैपासून लॉकडाउनला १९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर महापालिकेनं लॉकडाउन शिथिल करण्यात येत असल्याबद्दलचे आदेश काढले असून, कंटेनमेंट झोनला यातून वगळण्यात आलं आहे. कंटेनमेंट झोन असलेल्या प्रभागांमध्ये लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.