महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासह ठाणे जिल्ह्यालाही करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा चांगलाच फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात सातत्याने करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. अखेरीस स्थानिक प्रशासनाने ३० जूनपर्यंत शहरात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी ठाणे शहरातही १ ते ११ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापाठोपाठ अंबरनाथ नगरपरिषदेनेही ६ जुलैपर्यंत शहरातला लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक यांनी आज पत्रक काढत याविषयीची माहिती दिली.

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायत आणि औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम २६६ (२) प्रमाणे नगरपालिकेला स्थानिक बाजार बंद करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. करोनामुळे शहरात वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने ६ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असून या काळात भाजीपाला, फळं, दूध वगळता अन्य सर्व गोष्ट बंद राहणार आहेत. जिवनावश्यक वस्तूंसाठीही सकाळी ८ ते संध्याकाळी ५ ही वेळ ठरवून देण्यात आलेली असून रुग्णालयं आणि मेडीकल दुकानं कायम सुरु राहतील असं नगरपरिषदेने जाहीर केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान ठाणे शहरातही १ जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाउन लागू होईल. १ जुलै ते ११ जुलैपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. भाजी तसंच मासळी बाजारदेखील या काळात बंद असतील. मुंबईला ये-जा देखील करता येणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांना प्रवासाची परवानगी असणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. याआधी उल्हानसगर आणि भिवंडीत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तर नवी मुंबईतील कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.