बदलापूर : स्थानिक आमदारांच्या मागणीनंतर कुळगाव-बदलापूरमध्ये लागू करण्यात आलेली कठोर टाळेबंदी तीनच दिवसांत मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर आली. कठोर टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले.

आमदार किसन कथोरे यांनी गेल्या गुरुवारी पालिका मुख्यालयात तातडीची बैठक आयोजित करत मुरबाडच्या धर्तीवर बदलापूर शहरात कठोर टाळेबंदी लागू करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती. फक्त दवाखाने आणि औषधालये सुरू राहणार असल्याच्या भीतीने बदलापूर शहरातील नागरिकांनी शुक्रवारी बाजारपेठेमध्ये प्रचंड गर्दी केली होती. या गोंधळचे खापर आपल्यावर फुटेल या भीतीने शुक्रवारी दुपारी कुळगाव -बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे शहरात कठोर टाळेबंदी लागू करण्याची मागणी केली. रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी टाळेबंदीचा निर्णय लागू केला. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.

शनिवारी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे, मनसेच्या संगीता चेंदवणकर आणि राष्ट्रवादीसह इतर विविध पक्षांनी पालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कोणत्याही नियोजनाशिवाय शहरात टाळेबंदी लागू केल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून शहरातील रुग्णसंख्येचा लेखाजोखा त्यांच्यापुढे मांडला. रुग्णसंख्या कमी होत असताना शहरात कठोर टाळेबंदी लावणे अन्यायकारक असल्याचे सांगत ही टाळेबंदी तातडीने रद्द करण्याची मागणी म्हात्रे यांनी केली होती. त्यावर कठोर टाळेबंदी मागे घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कठोर टाळेबंदी शिथिल करत असल्याचे जाहीर केले. मंगळवारपासून शहरात सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांना मुभा मिळणार आहे. शहरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.