दुकाने, बाजारपेठा, उद्यानांमध्ये लगबग; जनजीवन पूर्वपदावर

ठाणे : राज्य सरकारने पंचस्तरीय विभागणीनुसार निर्बंध शिथिल केल्याने ठाणे शहरासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागांतील आस्थापना, बाजारपेठांमध्ये सोमवारी खरेदीसाठी गर्दी उसळली. ठाणे शहरात सर्वच आस्थापना, मॉल, सिनेमागृह आणि उपाहारगृहे दिवसभर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी उपाहारगृहे आणि सिनेमागृह पहिल्या दिवशी सुरू झाली नाहीत. उपाहारगृहांचा पहिला दिवस साफसफाई करण्यातच गेला. केशकर्तनालये सोमवार असूनही खुली करण्यात आल्याने तिथे नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. तलाव परिसर, उद्याने आणि मोकळे रस्ते अशा ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली होती.

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व आस्थापना आणि बाजारपेठा सोमवारी सकाळी सुरू झाल्या. जांभळीनाका बाजारपेठ, गोखले रोड, नौपाडा भागातील दुकानांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी केली होती. जांभळीनाका बाजारपेठेत फेरीवाल्यांची संख्या नेहमीच्या तुलनेत वाढली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. दुपारी अकरा वाजेनंतर शहरातील मॉल सुरू झाले. मात्र पहिल्या दिवशी तिथे फारशी गर्दी नव्हती. कोपरी बाराबंगला, उपवन, तीन हात नाका येथील उद्याने आणि हरितपथांवर नागरिकांनी सकाळी फेरफटका मारण्यासाठी गर्दी केली होती. शहरातील अनेक भागांत मोठे उपाहारगृहे पहिल्याच दिवशी बंद असल्याचे दिसून आले. साफसफाईची कामे, कामगार नसल्यामुळे अनेकांनी उपाहारगृहे बंद ठेवली होती. पहिल्या दिवशी ग्राहक येणे शक्य नाही, असे उपाहारगृह मालकांचे म्हणणे होते. चित्रपटगृहांना ५० टक्क््यांची मर्यादा असल्याने शहरातील चित्रपटगृहे बंद होती. काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही चित्रपटगृहांना परवानगी नाही. त्यामुळे एका शहरापुरते चित्रपटाचे वितरण करणे वितरकांना शक्य नाही. सर्व देशभरातील चित्रपटगृहे सुरू झाल्यास चित्रपटगृहे खुली करणे शक्य होणार आहे, असे सिनेमा ओनर्स अँड एक्सिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर आणि ग्रामीण क्षेत्रात यापूर्वी दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी होती. नव्या आदेशानुसार सोमवारपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा मिळाली आहे. त्यामुळे ग्राहक आणि दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी शहरातील व्यापारी संकुल, दुकाने, आस्थापना खुली करण्यात आल्याने रस्ते, बाजारात गर्दी दिसत होती. कल्याण-डोंबिवलीत पावसाळी चपला, रेनकोट खरेदीच्या दुकानांसमोर निर्बंध झुगारून नागरिकांनी गर्दी केली होती. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात पावसाळी रानभाज्या खरेदीसाठी           रहिवाशांनी गर्दी केली होती. मलंगपट्टा, भिवंडी ग्रामीण भागातून अनेक महिला टाकळा, शेवळा, कोऱ्हाळ कोवळा पाला घेऊन बाजारात आल्या आहेत. मुरबाड, शहापूर ग्रामीण भागातील महिला डोंबिवलीत पापड, मिरगुंडी, कुरडया, पापड्या विक्रीसाठी आल्या होत्या. सुकी मासळी विक्रीही सुरू होती.

उल्हासनगर शहरातील बाजारपेठा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या. या बाजारपेठांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक अशा सर्वच बाजारपेठा उघडल्या होत्या. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांमुळे शहरातील रस्त्यांवर कोंडीसदृश चित्र होते. अंबरनाथ शहरातही दुकाने सुरू झाल्याने नागरिकांनी गर्दी केली होती. बदलापूर शहरात नेहमीप्रमाणे बाजारपेठेत गर्दी झाली होती. मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील बाजारपेठांच्या गावांमध्ये नागरिकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. सोमवारी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसोबत इतर दुकाने, उपाहारगृहही खुले झाल्याने गर्दीत वाढ झाली होती. मुरबाडमधील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची मोठी वर्दळ दिसत होती. कल्याण-अहमदनगर राज्यमार्ग, शहापूरमधून जाणारे मार्गांवर असलेली उपाहारगृहे पूर्ण क्षमतेने सुरू झाली होती.

आदेशाबाबत पोलिसांमध्ये संभ्रम

ठाणे महापालिकेच्या दुसऱ्या स्तरामध्ये आस्थापना पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी आहे. त्या संदर्भात स्वतंत्र आदेश महापालिकेने काढला आहे, तरी कोपरी पोलिसांनी केवळ दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येत असल्याचा दावा करत चार वाजेनंतर अनेक दुकाने बंद केली. यामुळे या भागात गोंधळाचे वातावरण होते. या संदर्भात कोपरी पोलिसांना विचारले असता त्यांनी दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी असल्याचा दावा केला, तर ठाण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांना विचारले असता, दुकाने खुली करण्यास परवानगी दिल्यानंतरही ती बंद करण्याच्या घटना कुठे घडत असतील तर ते निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मॉलमध्ये तुरळक गर्दी

रेल्वे स्थानकांत गर्दी, गोंधळठाणे शहरात सोमवारपासून ५० टक्के क्षमतेने मॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.  पहिल्याच दिवशी ठाण्यातील मॉलमध्ये तुरळक गर्दी होती. अनेक तरुण आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी मॉलमध्ये आले होते.

व्यायामशाळा सुरू पण…

ठाणे शहरात व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरीही दोन महिन्यांपासून बंद असलेल्या व्यायामशाळेमध्ये सॅनिटायझर फवारणी, स्वच्छता करावी लागली. तसेच नागरिकांनाही व्यायामशाळा सुरू असल्याबाबत पुरेशी कल्पना नाही. संपूर्ण माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी आणखी एक ते दोन दिवस लागणार आहे, असे नायट्रो फिटनेस सेंटर या व्यायामशाळेच्या व्यवस्थापक प्रतिक्षा पांढरे यांनी सांगितले.

केशकर्तनालयाबाहेर रांगा

करोना टाळेबंदीमुळे केशकर्तनालयाची दुकाने बंद होती. निर्बंध शिथिल होताच सोमवारी ही दुकाने सुरू झाली. एरवी सोमवारी केशकर्तनालये बंद असतात. मात्र सोमवारी पहिलाच दिवस असल्यामुळे ही दुकाने सुरू होताच नागरिकांनी गर्दी केली. काही केशकर्तनालयांच्या बाहेर रांगा लागल्या होत्या.