News Flash

‘लॉजिस्टिक्सपार्क’चा अडथळा दूर

देशभरातील प्रमुख मोठय़ा कंपन्यांचा माल मुंबईत येण्यापूर्वी या गोदामांमधून साठवला जातो.

उद्योगांसाठी पोहोच रस्ता बंधनकारक करणारी अट शिथिल

बेकायदा गोदामांचे शहर असा शिक्का बसलेल्या भिवंडीत राज्यातील सर्वात मोठे लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याच्या मार्गातील मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. या प्रकल्पात उभारल्या जाणाऱ्या उद्योगांसाठी किमान १५ मीटर रुंदीचा पोहोच रस्ता असण्याची अट आता शिथिल करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जागेवरील अस्तित्वातील रस्त्यांची रुंदी लक्षात घेता पार्कसाठी आरक्षित असलेल्या जागेत सगळ्याच ठिकाणी १५ मीटर रुंदीचा पोहोच रस्ता उपलब्ध होणे शक्य नसल्याचे या ठिकाणी विकास प्रस्तावांना परवानगी देताना अडथळे उभे राहात होते. हे लक्षात घेऊन केवळ कंटेनर डेपो तसेच मल्टिमॉडेल वाहतूक उद्योगांनाच मोठय़ा रस्त्यांची ही अट बंधनकारक करण्यात आली आहे.

तिवरांच्या झाडांची कत्तल करत तसेच खाडी किनारे बुजवून यापूर्वी भिवंडी परिसरात शेकडोंच्या संख्येने बेकायदा गोदामे उभी राहिली आहेत. देशभरातील प्रमुख मोठय़ा कंपन्यांचा माल मुंबईत येण्यापूर्वी या गोदामांमधून साठवला जातो. त्यामुळे उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदर ते भिवंडीतील ही गोदामे अशी माल वाहतुकीची मोठी साखळी गेल्या काही वर्षांत उभी राहिली आहे. राज्यात भाजप सरकार सत्तेवर येताच हा सगळा पसारा लक्षात घेऊन या ठिकाणी नियोजित असे लॉजिस्टिक पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली. विकास नियंत्रण नियमावलीतील नियमांची अंमलबजावणी करत हे नवे पार्क उभारण्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी अजूनही याच भागात बेकायदा गोदामांची उभारणी सुरूच आहे. त्यामुळे या पार्कच्या उभारणीला वेग आणण्याचा प्रयत्न आता मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने सुरू केला असून या ठिकाणी उद्योगांना परवानगी देताना येत असलेले अडथळे दूर केले जात आहेत.

भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रात राज्य सरकारने यापूर्वीच महानगर विकास प्राधिकरणाची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. प्राधिकरणाच्या मंजूर विकास योजनेतील ट्रान्सपोर्ट हब आणि लॉजिस्टिक पार्क परिमंडळ क्षेत्रात जमिनींच्या विकास प्रस्तावास १५ मीटर रुंदीच्या पोहोच रस्त्याची अट बंधनकारक करण्यात आली होती. तथापी विकास योजनेत प्रस्तावित केलेल्या रस्त्यांमध्ये सुमारे ५०० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असून जागेवरील अस्तित्वातील रस्त्यांची रुंदी लक्षात घेता १५ मीटर रुंदीचा पोहोच रस्ता उपलब्ध होऊ शकत नसल्याची उपरती एमएमआरडीएला झाली आहे. या अटीमुळे या ठिकाणी उद्योगांच्या उभारणीस मंजुरी देताना अडथळे उभे राहात होते. हे लक्षात घेऊन एमएमआरडीएने आता येथील उद्योगांची तीन भागात वर्गवारी केली असून त्यानुसार पोहोच रस्त्यांसाठी ९, १२ आणि १५ मीटर रस्त्यांची अट टाकण्यात आली आहे. यामुळे या पार्कमध्ये सगळ्या प्रकारच्या उद्योगांना चालना मिळेल, असा दावा एमएमआरडीएतील वरिष्ठ सूत्रांनी केला.

नवी वर्गवारी

  • या पार्कमध्ये एखादा सेवा उद्योग उभारायचा असेल तर यापुढे नऊ मीटरचा पोहोच रस्ता असावा असे ठरविण्यात आले आहे.
  • लहान गोदामे, शीतगृह, वेअरहाऊससाठी १२ मीटर पोहोच रस्त्याची अट टाकण्यात आली आहे.
  • मोठे कंटेनर डेपो, मल्टिमोडम ट्रान्सपोर्ट उद्योगांसाठी मात्र १५ मीटर पोहोच रस्त्यांची अट बंधनकारक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2018 3:20 am

Web Title: logistics park tmc
Next Stories
1 आधारवाडीकर संघर्षांच्या पवित्र्यात
2 येऊरच्या जंगलात पुन्हा वणव्यांचे सत्र
3 जिल्ह्य़ातील नाराज ज्येष्ठ भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा
Just Now!
X