शिवसेनेच्या ‘आयात’ नेत्याला उमेदवारी देण्याचा आग्रह

ठाणे : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात राज्यभर सुरू असलेल्या भांडणाचीच पुनरावृत्ती आता भिवंडीत होऊ लागली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेल्या माजी खासदार सुरेश टावरे यांना विरोध करत पक्षातील ४२ नगरसेवकांनी सोमवारी बंडाचे निशाण फडकवले. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असलेले सुरेश म्हात्रे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, असा या नगरसेवकांचा आग्रह आहे. दुसरीकडे, गत लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार व कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनीही या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील हे विजयी झाले होते. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे विश्वनाथ पाटील यांचा पराभव झाला होता. माजी खासदार सुरेश टावरे यांचे तिकीट कापून विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी या दोघांमध्येही रस्सीखेच सुरू होती. या मतदारसंघातील कपिल पाटील यांचे कट्टरविरोधक असलेले शिवसेनेचे सुरेश म्हात्रे यांनीही काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पाटील यांच्याविरोधात शिवसैनिकांचा एक मोठा गट कार्यरत असून संपूर्ण मतदारसंघात त्यांच्याविरोधात शिवसैनिकांच्या मनात खदखद आहे. या नाराजीचा फायदा उचलण्याचा दावा म्हात्रे यांच्याकडून केला जात होता. दरम्यान, पक्षाने सुरेश टावरे यांची उमेदवारी जाहीर करताच भिवंडीतील अंतर्गत राजकारणाला वेग आला असून कँाग्रेस पक्षातील नगरसेवकांनी त्यांच्या उमेदवारीस विरोध केल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.

भिवंडी महापालिकेतील काँग्रेसच्या ४७पैकी ३५ नगरसेवकांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन टावरे यांच्या उमेदवारीला विरोध केला. गेल्या निवडणुकीत टावरे यांनी पक्षाचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांच्याविरोधात काम केले. महापौर निवडणुकीतही त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या. त्यामुळे टावरे यांना उमेदवारी दिल्यास पक्षाचे काम करणार नाही. यासाठी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक इम्रानवली मोहम्मद खान यांनी पत्रकार परिषदेत दिला. शिवसेनेचे सुरेश म्हात्रे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असून त्यांच्यामुळे पक्षाची ताकद वाढू शकते. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा फेरविचार व्हावा, यासाठी वरिष्ठांना पत्र पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.

विश्वनाथ पाटीलही नाराज

गेल्या लोकसभेत, महापौर आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या सुरेश टावरे यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांत नाराजी आहे. गावपातळीवर कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेत आहेत. त्यानंतर पुढील निर्णय होईल, असे विश्वनाथ पाटील यांनी म्हटले आहे. पक्षाने टावरे यांच्या उमेदवारीचा फेरविचार न केल्यास राज्यातून कुणबी सेनेचा काँग्रेसला असलेला पाठिंबा काढून घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

विविध निवडणुकीत पक्षविरोधी काम केले असते तर पक्षाने मला नोटीस बजावली असती किंवा माझ्यावर कारवाई केली असती. तसेच उमेदवारी देताना पक्षाने तक्रारीची दखल घेतली असती. माझ्यावरील आरोप खोटे आहेत.

-सुरेश टावरे, उमेदवार, काँग्रेस

काँग्रेस प्रवेशाआधीच उमेदवारीचे वेध

शिवसेनेचे स्थानिक नेते सुरेश म्हात्रे हे काँग्रेस पक्षातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असले तरी त्यांनी अद्याप काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही. तरीही त्यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले आहे. याबाबत नगरसेवकांकडे विचारणा केली असता, कपील पाटील यांनीही राष्ट्रवादी सोडून भाजपमधून निवडणूक लढविली होती. पाटील यांना टक्कर देण्याची क्षमता म्हात्रे यांच्यात आहे. म्हात्रे काँग्रेसच्या दरवाज्यामध्ये उभे आहेत. पण, जोपर्यंत काँग्रेस पक्ष दरवाजा उघडणार नाही तोपर्यंत ते आत कसे येऊ शकतील, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नगरसेवक इम्रानवली मोहमद खान यांनी दिले.