भाईंदर : डोक्यावर तळपते ऊन आणि मतदार याद्यांत गोंधळ असतानाही मतदानाबाबत मीरा भाईंदरमधील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ग्रामीण परिसरासह शहरी भागातही सकाळपासून मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. अनेक मतदान केंद्रांवर मतदान नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा सुरू झाल्याचे तसेच काही ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाला होता.

शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सुटी असल्याने मतदार बाहेरगावी जातील आणि त्याचा परिणाम मतदानावर होईल अशी भीती होती. परंतु मतदान केंद्राबाहेर सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत रांगा लागल्याचे दिसून आले. अनेक मतदारांना मतदानासाठी देण्यात येणाऱ्या याद्या मिळाल्या नव्हत्या. मात्र मतदारांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाचा वापर करून स्वत:चे मतदान केंद्र शोधून काढून मतदान केले. तरुण आणि वरिष्ठ नागरिकांमध्येही मतदानाबाबत उत्साहाचे वातावरण होते. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क तर बजावलाच मात्र मतदान केल्यानंतर कुटुंबासह सेल्फी काढून तो समाजमाध्यमांवर पोस्ट करण्याची चढाओढ तरुण-तरुणींमध्ये दिसून आली.

मतदानाची वेळ सकाळी सात वाजल्यापासून होती, मात्र अनेक मतदान केंद्रांवर अर्धा तास उशिराने मतदान सुरू झाले. मतदान कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट यंत्र कशी जोडायची याची माहिती नसल्याने मतदानाला उशीर झाला. काही मतदान केंद्रांवर कर्मचारीही उशिरा पोहोचल्याने त्यात आणखी भर पडली. मतदान यंत्रे बंद पडल्याच्या घटना काही मतदान केंद्रांवर घडल्या. भाईंदर पूर्व येथील शंकर नारायण महाविद्यालय, अभिनव विद्यामंदिर, मीरा रोडमधील सेंट थॉमस हायस्कूल, काशी गाव येथील मराठी शाळा, वरसावे शाळा आदी ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने मतदारांचा चांगलाच खोळंबा झाला. त्यामुळे मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.

दरवेळेप्रमाणे यंदाही मतदारयाद्यांमध्ये असलेल्या गोंधळामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. एकाच घरातील काही मतदारांची नावे मतदार याद्यांमध्ये नसणे, घरातील एका व्यक्तीचे नाव भलत्याच मतदार यादीत असणे, मतदार यादीत नावापुढे चुकीचे छायाचित्र असणे अथवा नावात चूक असणे अशा विविध कारणांमुळे मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. भाईंदरमधील एका मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांकडे असलेल्या मतदार यादीतील चक्क एक पानच गहाळ झाल्याने तब्बल ३० मतदारांना परत पाठविण्यात आले. मीरा रोड मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचे नाव चक्क दुसऱ्या टोकाला म्हणजे उत्तन येथील चौक गावाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते. मात्र निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील ओळखपत्राच्या आधारे नाव शोधण्याच्या सुविधेमुळे राजकीय कार्यकर्त्यांनाही मोठा दिलासा मिळाला.

राजकीय पक्षांच्या बुथवर कार्यकर्ते हाती मोबाईल घेऊनच बसलेले दिसत होते. काही जण मतदारांना त्यांचे नाव, मतदान केंद्र याची माहिती थेट व्हॉट्स अ‍ॅपवर देखील पाठवत होते. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सुविधा नसल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या. मतदान केंद्राबाहेर उभे राहण्यासाठी कोणताही आडोसा नसल्याने मतदारांना तासन तास उन्हात उभे राहावे लागले. तसेच मतदान केंद्रात त्यांचे मतदान नमके कुठे आहे याची माहिती सांगणारे कर्मचारीच नसल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडत होता.