News Flash

मतदारांची धावाधाव!

विविध राजकीय पक्षांकडून मतदार यादी क्रमांक आणि बुथची माहिती असलेल्या चिठ्ठय़ा मतदारांना वाटल्या जातात.

ठाण्यातील मतदार याद्यांचा घोळ, संथ मतदान प्रक्रिया यामुळे मतदानासाठी लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मतदार पावत्यांअभावी नावे शोधताना दमछाक; सुविधांची अनेक ठिकाणी वानवा

ठाणे : मतदारांसाठी मतदान प्रक्रिया सोपी व सोयीची करण्यासाठी निवडणूक प्रशासनाने आखलेल्या विविध घोषणा कागदावरच राहिल्याचे चित्र सोमवारी ठाणे, कल्याण आणि भिवंडी मतदारसंघांतील अनेक मतदान केंद्रांवर दिसून आले. मतदान दिवसाच्या तीन दिवस आधी मतदार पावत्या वाटण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली असतानाही प्रत्यक्षात या पावत्या मतदारांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांना आपली नावे शोधताना धावपळ करावी लागत होती. मतदान केंद्रांवर तीन रांगा करण्याच्या आयोगाच्या सूचनेलाही हरताळ फासल्याचे दिसून आले. त्यामुळे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना लांबलचक रांगांचा अडथळा पार करावा लागला.

विविध राजकीय पक्षांकडून मतदार यादी क्रमांक आणि बुथची माहिती असलेल्या चिठ्ठय़ा मतदारांना वाटल्या जातात. मात्र, यंदा अशा चिठ्ठय़ा ग्राह्य़ धरल्या जाणार नाहीत, निवडणूक विभागाकडून दिल्या जाणाऱ्या चिठ्ठय़ा ग्राह्य़ धरल्या जातील, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले. तसेच मतदान केंद्राबाहेर चिठ्ठय़ा देण्यासाठी यंत्रणा उभारली होती. मात्र अनेक मतदारांना चिठ्ठय़ा मिळत नव्हत्या. मतदान केंद्राबाहेर निवडणूक विभागामार्फत जेमतेम एखाद्-दोन कर्मचारी नाव शोधून देण्यासाठी नेमण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनाही ही यंत्रणा पुरेशा प्रमाणात राबविणे जमले नाही. त्यामुळे मतदार राजकीय पक्षांच्या बुथवर गर्दी करताना दिसत होते.

मतदान प्रक्रिया सोयीची करून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये मतदान केंद्रांवर पुरुष, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगा, मतदान केंद्रांजवळ पाळणाघर, अपंग व वयोवृद्धांसाठी डोली पुरवणे या घोषणांचा समावेश होता; परंतु अनेक मतदान केंद्रांवर या ना त्या सुविधेचा अभाव दिसून आला.

पोलीस कर्मचारी रांगेजवळ फेरफटका मारायचा आणि ज्येष्ठ नागरिक किंवा अपंग मतदार आहेत का, याची विचारणा करायचा. रांगा थांबवून त्यांना मतदानासाठी पाठवायचा, असे चित्र सर्वत्र होते.

सात सेकंदांचा विलंब

मतदान यंत्रावरील उमेदवारासमोरील बटण दाबल्यानंतर सात सेकंदांच्या कालावधीत व्हीव्हीपॅट यंत्रावर मतदान केल्याची चिठ्ठी दिसते. या प्रक्रियेमुळे मतदानासाठी वेळ लागत होता आणि त्यामुळेच मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

येऊरमध्ये सुविधा अपुऱ्या

ठाणे शहरातील येऊर भागातील मतदारांसाठी त्याच भागातील एका शाळेत मतदान केंद्र उभारण्यात आले होते. तिथे कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. तेथील नागरिकांच्या मदतीने ते दुकानांमधून पाणी विकत आणत होते, असे चित्र दिसून आले.

अपंग मतदारांसाठी रिक्षा

अपंग मतदारांना मतदान केंद्र ते घर या प्रवासासाठी निवडणूक विभागाने रिक्षांची व्यवस्था केली होती. त्यामुळे अपंगांना अडथळय़ाविना मतदान करता आले.

सेल्फी पॉइंट

ठाण्यातील वर्तकनगर येथील सिंघानिया शाळेजवळ सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी मतदार गर्दी करत होते.

बहुतांश मतदान केंद्रांवर तीन वेगवेगळ्या रांगा होत्या. काही मतदान केंद्रांच्या बाहेरील परिसराची जागा लहान असल्याने त्या ठिकाणी तीन रांगा करण्यास व्यत्यय आला. त्यामुळे मतदारांची एकच रांग करण्यात आली. मात्र असे असले तरी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि अपंगांना मतदान कक्षात जाण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येत होते. डोली तसेच व्हील चेअरची सुविधाही मतदान केंद्रावर होती.

– अनिल पवार, निवडणूक निर्णय अधिकारी- ठाणे लोकसभा मतदारसंघ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 2:31 am

Web Title: lok sabha election 2019 lack of facilities at many polling stations in thane
Next Stories
1 वाढत्या तापमानातही उत्साह, पण रांगांचा ताप!
2 दुपारनंतर मतदान केंद्रांकडे नागरिकांची पाठ
3 बदलापुरात याद्यांतील घोळाचा फटका
Just Now!
X