मतदानानंतर उमेदवारांचा ‘आजचा दिवस माझा’; कार्यकर्त्यांच्या बैठकी, निवडणुकीचा आढावा घेणेही सुरूच

लोकसत्ता प्रतिनिधी

कुणी बॅडमिंटन खेळण्यात तर कुणी कुटुंबासोबत गप्पा मारण्यात दंग. कुणाचे दोन दिवस मुंबईबाहेर जाण्याचे बेत तर कुणाचा ‘अ‍ॅव्हेंजर्स’ पाहण्यावर भर.. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यापासून अहोरात्र बैठका, सभा, प्रचारफेऱ्या, भेटीगाठी, मोर्चेबांधणी, मुलाखती यांत पूर्णपणे अडकून पडलेल्या उमेदवारांनी मंगळवारी, मतदानानंतरचा दिवस स्वत:साठी देण्याला प्राधान्य दिले. मतदानानंतर या उमेदवारांची धावपळ थंडावली असली तरी, निकालाचे दडपण कायम आहे.

निवडणुकीस उभ्या असलेल्या कोणत्याही उमेदवाराच्या मागे त्याच्या पक्षाची, कार्यकर्त्यांची मोठी यंत्रणा काम करत असते. परंतु त्यामुळे उमेदवारांवरील ताण कमी होतो असे नाही. भल्या पहाटे सुरू होणारा दिनक्रम, दिवसभर सुरू असलेली प्रचारफेरीतील पायपीट, चौकसभा, जाहीर सभा, मतदारांच्या भेटीगाठी तसेच व्यूहरचनेसाठी रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बैठका या साऱ्यांमुळे निवडणुकीच्या काळात उमेदवाराला त्याच्या कुटुंबासाठी किंवा मित्रमंडळींसाठीच नव्हे तर, स्वत:साठीही वेळ देणे शक्य होत नाही.  मुंबईसह ठाणे, पालघर या मतदारसंघांतील लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सोमवारी सायंकाळी सहाला संपली. परंतु प्रत्येक मतदान केंद्रांतील मतदानाचा आढावा घेईपर्यंत सोमवारची रात्रही ताणातच गेली. त्यामुळे अनेक उमेदवारांनी मंगळवारी स्वत:साठी आणि कुटुंबासाठी देण्यावर भर दिला.

वायव्य मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी महिनाभरानंतर बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला तर, उत्तर मध्य मुंबईच्या भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी मुलीसह ‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ पाहण्यासाठी तिकिटे ‘बुक’ केली. मंगळवारचा संपूर्ण दिवस त्यांनी मुलगी आणि आईसोबत घालवला. उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या ऊर्मिला मातोंडकर यांनी दोन दिवस मुंबईबाहेर घालवण्याचा बेत आखला, तर उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेसच्याच प्रिया दत्त यांनी टीव्ही पाहात, कुटुंबासमवेत गप्पा मारत विश्रांती घेतली. दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी एक-दोन ठिकाणी सांत्वन भेटी घेतल्या, तर दक्षिण मध्य मुंबईतील काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांनी मंगळवारी सायंकाळी लग्नसोहळ्यांना हजेरी लावली.

मतदानानंतर उमेदवारांवरील ताण कमी झाला असला तरी, निकालापर्यंत दडपण कायम आहे. त्यामुळे मंगळवारी प्रत्येक उमेदवाराने कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मतदानयंत्रांतील दोष, यंत्रे सील करण्याची प्रक्रिया, निवडणूक खर्चाचा हिशोब यातही उमेदवारांचा दिवस गेला.

‘आजचा दिवस माझा’

मतदानानंतर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा दिवस कसा गेला?

ठाणे

राजन विचारे, शिवसेना

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे नित्यनियमाने पूजापाठ केला. पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी घरीच आले होते. त्यामध्ये मतदारसंघात झालेल्या मतदानाविषयी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्याचदरम्यान मोबाइलवरूनही ते काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून मतदान कसे झाले, याचा आढावा घेत होते. घरामध्येच दुपापर्यंत त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबतच्या बैठका सुरूच होत्या.

आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा मंगळवार पहाटेपासून मतदान यंत्रे सील करण्याच्या प्रक्रियेवर जागता पहारा सुरू होता. घोडबंदर भागातील न्यू होरायझन स्कूल येथील मतमोजणी केंद्रावर सर्वच ठिकाणची मतदान यंत्रे ठेवून सील करण्याची प्रक्रिया सुरू होती. या ठिकाणी पहाटेच्या सुमारास मतदान यंत्रे पोहोचली. त्यामुळे पहाटेपासूनच आनंद परांजपे हे तिथे उपस्थित होते आणि प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून होते. मात्र, ही प्रक्रिया सकाळी १०.३० वाजेपर्यंत पूर्ण झाली नव्हती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला हे त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आनंद हे घरी गेले आणि त्यानंतर काही वेळात त्यांनी पाचपाखाडी येथील कार्यालय गाठले. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा करीत होते.

भिवंडी

सुरेश टावरे, काँग्रेस

कार्यालयात जमलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते मतदानाचा आढावा घेत होते. त्याच वेळेस काही पदाधिकाऱ्यांनी मोबाइलवरून संपर्क साधून त्यांना मतमोजणी केंद्रावर बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी भिवंडी येथील एलकुंडे परिसरातील महावीर फाऊंडेशन प्रेसिडेन्सी स्कूल हे मतमोजणी केंद्र गाठले. तिथे मतदान यंत्रे सील करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया पाहून ते पुन्हा कार्यालयात परतले. दुपापर्यंत कार्यालय, सायंकाळी कुटुंबाबरोबर वेळ घालविला.

कपिल पाटील, भाजप

निवडणुकीची रणनीती, सकाळी कार्यकर्त्यांशी संवाद, रात्री उशिरापर्यंतच्या बैठका यामधून सोमवारी सायंकाळी उसंत मिळाली. मात्र, सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत आणि मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून त्यांचा फोन खणखणतच होता. माळशेजपासून वाडा आणि कसाऱ्यापासून कशेळी-दिवेअंजूपर्यंतच्या विस्तीर्ण मतदारसंघातील परिस्थितीची प्रत्येक कार्यकर्ते त्यांना माहिती देत होते. पाटील यांचा दिवस दररोज ५ वाजता सुरू होतो. निवडणूक आटोपली असली तरी मंगळवारी त्यांचा नित्यनेमाने दिनक्रम सुरू होता. सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम केला. प्रचाराच्या धावपळीत कुटुंबीयांबरोबर मनमोकळा संवाद साधता येत नव्हता. मात्र, मंगळवारी त्यांनी कुटुंबीयांबरोबर वेळ घालविला.

कल्याण

बाबाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील हे दररोजची निवडणूक कामाची असलेली धावपळ संपल्याने थोडे निवांत होते. सोमवारी निवडणूक संपल्यानंतर दिवसभर थकलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, रात्री उशिरापर्यंतचे जागरण. कल्याण लोकसभा मतदारसंघात किती मतदान झाले, त्यात कोणाला किती मते पडू शकतात याचा त्यांनी आढावा घेतला. सोमवारची धावपळ, कोणी काम केले, कोणी केले नाही, याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना

निवडणुका जाहीर झाल्यापासून पायाला भिंगरी लावून फिरणारे डॉ. श्रीकांत शिंदे हे मंगळवारी थोडे आरामातच उठले. सकाळी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ते कोणत्या भागात किती मतदान झाले, याचा आढावा घेत होते. कळवा ते अंबरनाथ पट्टय़ात कोठे, कसे मतदान झाले, त्यापैकी आपल्याला किती मते मिळतील, २७ गावांत यापूर्वी किती आणि आता किती मतदान झाले. शहरी पट्टय़ात कोणत्या भागात किती मतदान झाले याचा आढावा त्यांनी घेतला.

पालघर

राजेंद्र गावित, उमेदवार भाजप

राजेंद्र गावित यांच्या दिवसाची सुरुवात नित्यनेमाने झाली. त्यानंतर त्यांनी सकाळी दूरध्वनीवरून प्रचारात मदत करणाऱ्यांचे आभार मानले. सकाळी कार्यकर्त्यांचे येणे-जाणे सुरूच होते. त्यादरम्यान मतदानाच्या टक्केवारीचा अभ्यासही सुरू होता.

बळीराम जाधव, बहुजन विकास आघाडी

बविआचे बळीराम जाधव यांनीदेखील मंगळवारची सकाळ मतदानाचा आढावा घेण्यात घालवली. दुपारी त्यांनी मतदान यंत्रे ठेवलेल्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पाहणी केली. त्यानंतर निवडणुकीत मदत करणाऱ्यांशी संवाद साधला.

पार्थ पवार, राष्ट्रवादी

सोमवारी रात्री पूर्ण झोप घेतल्याचे सांगितले. दुपारनंतर कार्यालयात जाऊन   खोळंबलेली कामे पाहिली. पुढील दोन दिवस मोबाइल बंद करून संपूर्ण वेळ कुटुंबीयांसोबत काढणार आहेत. आता आजीला भेटण्याची ओढ लागली आहे. आजीसोबत काठेवाडीला राहणे, तेथे कोणत्याही मोबाइल फोनची ट्रिंगट्रिंग नाही अशाच वातावरणात राहण्याचा बेत आहे.