प्राथमिक फेरी २ दिवस रंगणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यभरातील एकांकिका स्पर्धामध्ये अवघ्या सहा वर्षांतच आपली वेगळी ओळख आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची ठाणे विभागीय प्राथमिक फेरी शनिवार आणि रविवारी पार पडणार आहे. यंदा ठाणे विभागातून मोठय़ा प्रमाणात महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याने दोन दिवस चालणाऱ्या या प्राथमिक फेरीतून विभागीय अंतिम फेरीसाठी एकांकिकांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे सहभागी महाविद्यालयांतील वातावरण पूर्णपणे ‘लोकांकिका’मय झाले आहे.

महाविद्यालयीन जगतामध्ये मानाची एकांकिका स्पर्धा अशी ओळख असणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या सहाव्या पर्वाच्या प्राथमिक फेरीची गुरुवारी औरंगाबाद आणि पुणे येथून सुरुवात झाली. दरवर्षी डिसेंबर महिन्यात रंगणाऱ्या या स्पर्धेची महाविद्यालयाच्या तरुणांमध्ये जोरदार चर्चा असते. लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना दरवर्षी दिग्गज परीक्षक      आणि कलावंतांचे वेळोवेळी मार्गदर्शनही मिळत असते. या स्पर्धेच्या ठाणे विभागीय प्राथमिक फेरीची सुरुवात ही आज, शनिवारपासून होणार आहे. यंदाच्या वर्षी प्राथमिक फेरीसाठी विविध महाविद्यालये सहभागी झाली असल्याने प्राथमिक फेरी दोन दिवस आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी गेल्या दोन महिन्यांपासून तालीम करत असल्याचे महाविद्यालयीन तरुणांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या फेरीपासून दर्जेदार अभिनयासह तरुणांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध नाटय़कर्मी परीक्षक ठाणे विभागीय प्राथमिक फेरीचे परीक्षण करणार असून त्यातून दर्जेदार एकांकिकांची निवड विभागीय अंतिम फेरीसाठी करण्यात येईल. विभागीय अंतिम फेरीत सवरेत्कृष्ट ठरणारी एकांकिका महाअंतिम फेरीत ठाण्याची ‘लोकांकिका’ म्हणून स्पर्धेच्या जेतेपदासाठी सादर होईल.

यंदाच्या वर्षी लोकसत्ता लोकांकिकेच्या महाअंतिम फेरीसाठी रंगभूमीची प्रगल्भ जाण, प्रयोगशील भान आणि विलक्षण प्रतिभा लाभलेले अभिनेते नसिरुद्दीन शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्रायोजक 

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत, ‘लोकसत्ता लोकांकिका २०१९’ या स्पर्धेचे ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ हे सहप्रायोजक आहेत. तर, ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटरटेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि एम. के. घारे ज्वेलर्स हे पॉवर्डबाय पार्टनर आहेत. तसेच, ‘रणथंबोर सफारी’ आणि ‘ईशा नेत्रालय’ हे या स्पर्धेचे रिजनल पार्टनर आहेत. लोकसत्ता लोकांकिकेच्या कलाकारांना चित्रपट-मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेंट पार्टनर असून ‘अस्तित्व’च्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokankika loksatta akp
First published on: 07-12-2019 at 01:47 IST