‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमाचे यश; वसई-विरार शहरातील वीजग्राहकांकडून समाधान

वसई-विरार शहरातील विविध नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी, या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गेल्या वर्षभरात ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांनी विविध घोषणा केल्या होत्या. या घोषणांचे काय झाले हे सांगणारी वृत्तमालिका आजपासून दररोज..

वसई : नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लाऊडस्पीकर’ कार्यक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. जुलै महिन्यात झालेल्या वीज समस्येवरील कार्यक्रमात खुद्द ऊर्जामंत्र्यांनी दिलेली अनेक आश्वासने पूर्ण झाली आहेत. त्यानुसार नालासोपारा येथे उच्च क्षमतेचे उपकेंद्र तयार झाले असून पुराच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी वसईतील उपकेंद्राची उंची वाढवण्यात आली आहे. नवीन रोहित्रांची संख्या वाढवण्यात आली असून धोकादायक वीजवाहक तारा बदलण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र वीजग्राहकांना सतावणारी वाढीव वीजदेयकांची समस्या कायम राहिली आहे.

वसई-विरार शहरात साडेआठ लाख वीजग्राहक आहेत. तसेच मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. महावितरणामार्फत येथे वीज पुरवली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून वीजग्राहक विविध समस्यांनी त्रस्त झाले होते. त्यांचे ऐकणारे कुणी नव्हते. राजकीय पक्षही हतबल झाले होते. महावितरणकडून केवळ आश्वासनांवर बोळवण केली जात होती. ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ या कार्यक्रमातून वीजग्राहकांच्या समस्यांना वाचा फोडण्यात आली. नागरिकांच्या वीज समस्यांचे निवारण करण्यासाठी थेट ऊर्जामंत्र्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेसमोर आणले.

ऊर्जामंत्री आल्याने आजवर कधीही नागरिकांना न भेटणारे कल्याण परिमंडळातील सर्व वरिष्ठ अधिकारी, कार्यकारी अभियंते, अधीक्षक, सनदी अधिकारी या कार्यक्रमास आले आणि त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ऊर्जामंत्र्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून कार्यक्रमातच अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. आजवर ज्या समस्या ऊर्जामंत्र्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या, त्या पोहोचल्या आणि समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. २८ जून २०१९ रोजी हा कार्यक्रम झाला आणि ८ महिन्यांतच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होताना दिसू लागली आहे. नालासोपारा येथे उच्चदाब क्षमतेचे नवीन उपकेंद्र वसईकरांना मिळाले. त्यामुळे वारंवार खंडित होणारी वीज समस्या दूर होण्यास मदत झाली आणि नियमित वीजपुरवठा सुरू झाला. वसईचे उपकेंद्र पाण्याखाली जात होते आणि वसई अंधारात बुडायची. या उपकेंद्राची उंची वाढवण्यात आली. नवीन रोहित्र बसविणे, धोकादायक वीजवाहक तारांची दुरुस्ती करणे, शेतकऱ्यांना सौरऊर्जा पुरविणे, वीजचोरांवर कारवाई करणे, नादुरुस्त वीज मीटर बदलण्याच्या कामांना प्राधान्य देणे, शहरी भागातील धोकादायक वीजवाहक तारा भूमिगत करणे आदी कामांना सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप सर्व धोकादायक रोहित्रांना संरक्षक जाळ्या बसवण्यात आलेल्या नाहीत. तसेच वाढीव वीजदेयकांचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात वीजग्राहकांनी तक्रारी मांडल्या. त्या समस्यांचे निवारण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने या समस्या सोडविल्या जात आहेत, सुधारण होत असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता मंदार अत्रे यांनी सांगितले.

महावितरणच्या समस्या पूर्ण सुटल्या नसल्या तरी या कार्यक्रमामुळे आणि ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.