‘लोकसत्ता आरोग्यभान’ कार्यक्रमात तज्ज्ञांचा निर्वाळा

वरण-भात, भाजी-पोळी, ज्वारीची भाकरी असा साधा, सोपा आणि संतुलित आहारच उत्तम आरोग्यासाठी हितकारक असल्याचा निर्वाळा ‘लोकसत्ता आरोग्यभान’ या विशेष कार्यक्रमात तज्ज्ञ मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना दिला.

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे आणि आयुर्वेदतज्ज्ञ प. य. वैद्य खडीवाले यांनी उत्तम आहार हेच ठणठणीत तब्येतीचे औषध असल्याचे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

हल्ली धावपळीच्या जीवनात मोठय़ा प्रमाणात पाव खाल्ला जात असला तरी तो आरोग्यासाठी बाधक आहे. कणीक न चाळता केलेल्या जाडय़ाभरडय़ा चपात्या किंवा ज्वारीच्या भाकऱ्या खाणे कधीही उत्तम आहे. मैदा शरीराला घातक, त्यामुळे मैद्याचे पदार्थ टाळावेत. आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्ली जात असल्याने वरकरणी गोड वाटणारी साखर प्रत्यक्षात आपले आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरते. त्याने अनेक विकारांना आमंत्रण मिळते. गोडासाठी साखरेऐवजी गूळ खावा. त्याच्यामध्ये लोह असते. आहारामध्ये १५ ते २० टक्के प्रथिनांची आवश्यकता असते. लहानपणी मुलांच्या डब्यात आढळून येणारी गूळ-तूप-चपाती हा अतिशय उत्तम पौष्टिक आहार होता, असे  डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

‘‘मराठी माणसांनी ज्वारी सोडल्यापासून त्यांच्यापाठी पंजाब्यांचे रोग लागले. आपल्या आहारातील असे काही दोष दूर केले तर आरोग्य ठणठणीत राहील,’’ अशी ग्वाही आयुर्वेदतज्ज्ञ प. य. खडीवाले यांनी सुरुवातीलाच दिली. ‘‘सध्या सर्रास पाव-बिस्किटे खाल्ली जात असली तरी हे पदार्थ आरोग्यास हानिकारक आहेत. ते खाऊ नका.

रात्रीच्या जेवणानंतर २० मिनिटे चालण्याची सवय लावून घेतली तर अनेक रोगांपासून दूर राहता येईल. आरोग्य चांगले राखण्यासाठी तुपाचा वापर करा. दुपारी झोपू नका. जो दुपारी झोपला, तो संपला, असे समजा. मधुमेहींनी तर अजिबात दुपारी झोपू नये. घराघरांत बोकाळलेल्या फ्रिज संस्कृतीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी फ्रिजचा वापर टाळा. लसूण, पुदिना आणि आल्याची चटणी आरोग्यास हितकारक आहे. मुगासारखी कडधान्ये, पालेभाज्या यांचा आहारात समावेश असावा. डाळिंब, पपई ही फळे खावीत, असा सल्ला खडीवाले यांनी उपस्थितांना दिला. दोन्ही तज्ज्ञांनी श्रोत्यांनी विचारलेले प्रश्न आणि शंकांचे निरसन केले.

तुडुंब प्रतिसाद

  • ‘लोकसत्ता आरोग्यभान’ या विशेष कार्यक्रमात अनुभवी तज्ज्ञांचे आरोग्याविषयीचे विचार ऐकण्यासाठी ठाणेकरांनी मोठय़ा संख्येने कांती विसारिया सभागृहात गर्दी केली होती. सभागृहात बसायला खुच्र्या शिल्लक नसल्याने अनेकांनी उभे राहून, तर काहींनी चक्क जमिनीवर बैठक मारून हे मौलिक मार्गदर्शन पदरात पाडून घेतले.
  • ‘युआरफिटनेस्ट’ हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक असून ‘साने केअर’ हे हार्ट केअर पार्टनर आहेत. तसेच हा कार्यक्रम पॉवर्ड बाय पुणे येथील ‘भारती संस्कृती दर्शन ट्रस्ट’, ‘लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’, ‘युअर मॉल’, ‘आयुशक्ती’ आणि ‘आरआयएसओ १०० टक्के राइसब्रान ऑइल’ आहे.