ठाण्यात ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ परिसंवादाचे आयोजन

मुंबई : बदलत्या जीवनशैलीने माणसाचे आयुष्य सुखकर झाले आहे, मात्र त्याबरोबरच अनेक व्याधीही जडू लागल्या आहेत. निरामय आरोग्य प्राप्त करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे प्रयत्न नेमके कसे असावेत, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ठाणे येथे ‘आरोग्यमान भव’ परिसंवादाचे आयोजन केले आहे. येत्या १५ व १६ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हा कार्यक्रम होईल.

शहरातील धावपळीच्या जीवनात ‘रेडी टू इट’ पदार्थाचा वाढता वापर, जिभेला चटकदार वाटणाऱ्या बाहेरील पदार्थावर मारला जाणारा ताव यामुळे संतुलित आहाराची घडी विस्कटली आहे. निरोगी जीवनाचा मार्ग पोटातून जातो. आहारावर लक्ष देणे आवश्यक असून घरच्या घरी कमीत कमी वेळात तयार केले जाणारे पौष्टिक पदार्थ, त्यांच्या निरनिराळ्या पद्धती आणि शरीराला होणारे फायदे यावर आहारतज्ज्ञ डॉ. शिल्पा जोशी (१५ मार्च) आणि आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अरुणा टिळक (१६ मार्च) ‘घरच्या घरी पौष्टिक आहार’ या परिसंवादामध्ये मार्गदर्शन करतील.

व्यायाम करायला वेळ नाही, ही सबब देणाऱ्यांसाठी योग हा उत्तम पर्याय कसा ठरू शकेल याचा उलगडा ‘योग आणि आरोग्य’ या व्याख्यानात आयुर्वेद आणि योगतज्ज्ञ डॉ. आशीष फडके करतील. ‘महिलांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये संवाद साधणार आहेत. कुटुंब, नोकरी, करिअर अशा विविध जबाबदाऱ्या खांद्यावर पेलणाऱ्या महिलेला दैनंदिन जीवनात येणारा मानसिक ताणतणाव, अडचणी आणि उपाय यांचा आढावा ते घेतील. वरील दोन्ही वक्ते १५ आणि १६ मार्च रोजी याच विषयावर श्रोत्यांना मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर श्रोत्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देतील. या कार्यक्रमानिमित्त आरोग्यविषयक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

प्रवेशिका

या कार्यक्रमासाठी २० रुपये प्रवेश शुल्क असून प्रवेशिका ८ मार्चपासून लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, कॉसमॉस बँकेच्यावर, नौपाडा, जिन्स जंक्शन, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प) आणि टिप-टॉप प्लाझा, एल.बी.एस. मार्ग येथे सकाळी १० ते ५ वेळेत उपलब्ध असतील. ऑनलाइन बुकिंगसाठी indianexpress-loksatta.go-vip.net या संकेतस्थळाला भेट द्यावी.

कधी? : १५ व १६ मार्च (सकाळी १० ते दुपारी ३)

कुठे ? :  टिप-टॉप प्लाझा, एल.बी.एस. मार्ग, ठाणे (प.)

प्रायोजक

‘आरोग्यमान भव’ या कार्यक्रमाचे वास्तु रविराज, पितांबरी प्रोडक्ट्स प्रा. लि. सहप्रायोजक असून पॉर्वड बाय पार्टनर तन्वी हर्बल आणि हिलिंग पार्टनर ब्रह्मविद्या आहेत. बँकिंग पार्टनर डीएनएस बँक आहे. हेल्थ इव्हेंट सपोर्टेड बाय आशापुरा ग्लोबल प्रोजेक्ट आणि मँगो व्हिलेज, गुहागर आहे.