लोकसत्ता आरोग्यमान भवमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन

आहार, विहार आणि सकारात्मक विचार हीच निरोगी शरीर-मनाची त्रिसूत्री कशी ठरू शकते, याचे अभ्यासपूर्ण आणि रंजक विवेचन ऐकण्याची संधी शुक्रवारी ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाणेकरांना मिळाली. वेगवान आणि ताणतणावांनी ग्रासलेल्या जीवनशैलीतील योग्य आहाराचे गणित समजून घेण्यासाठी ठाणेकरांनी ‘टिपटॉप प्लाझा’ येथे गर्दी केली होती. सकाळपासून सुरूअसलेल्या चर्चासत्रांत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी मांडलेली मते उपस्थितांसाठी मार्गदर्शक ठरली.

आयुर्वेदाचा आधार घेत वैद्य आश्विन सावंत यांनी आहाराचे प्रमाण आणि अयोग्य आहाराचे दुष्परिणाम याविषयी केलेले माहितीपूर्ण विवेचन सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी उपयुक्त ठरले. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांनी ‘जिच्या हाती आरोग्याची दोरी’ या विषयावरील व्याख्यानात महिलांच्या आरोग्याविषयी सोदाहरण मार्गदर्शन केले. मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या महिलांसाठी हे व्याख्यान विशेष लक्षवेधी ठरले.

शरीरस्वास्थ्यासोबतच मनाचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी काय करता येईल, याची माहिती केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागप्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी अतिशय रंजक पद्धतीने दिली. सकारात्मक दृष्टिकोनातून मनाला रुचेल अशी कृती करण्यातच जगण्याचा आनंद सामावलेला असल्याचे त्यांनी अतिशय सोप्या भाषेत सांगितले. त्यामुळे मानसिक स्वास्थ्याबद्दल शंका असणाऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. प्रेक्षकांच्या शंकांचे निरसन प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करण्यात आले. योग्य आहारासोबतच नियमित व्यायाम केल्यास शरीर स्वास्थ्याचा मार्ग निरोगी राखता येतो, आयुष्यातील वळणांचा स्वीकार सकारात्मक पद्धतीने केल्यास मानसिक स्वास्थ्य जपता येते, अशी गुरुकिल्ली या कार्यक्रमातून प्रेक्षकांना गवसली.

प्रायोजक

माधवबाग प्रस्तुत लोकसत्ता ‘आरोग्यमान भव’ हा कार्यक्रम पॉवर्ड बाय तन्वी, पितांबरी, शीतल हर्बल आणि नाना एन्टरप्राइज प्रा.लि. असून या कार्यक्रमाला हेल्थ पार्टनर एसआरव्ही ममता रुग्णालय, हॉस्पिटल पार्टनर ज्युपिटर हॉस्पिटल आणि बँकिंग पार्टनर डीएनएस बँक यांचे सहकार्य लाभले आहे.

कार्यक्रम खूप छान आहे. आजच्या शिकलेल्या पिढीला अनेक गोष्टी माहीत असतात, परंतु कळते पण वळत नाही, अशी स्थिती असते. अशा कार्यक्रमांमुळे आपल्याकडे असलेल्या माहितीचा रोजच्या दिनक्रमामध्ये वापर करण्याची प्रेरणा मिळते. अशी माहिती लोकांना वारंवार देणे आवश्यक असते. त्यामुळे ‘आरोग्यमान भव’ सारख्या कार्यक्रमांची फारच मदत होते.

संध्या बागूल, ठाणे

मी दरवर्षी आवर्जून या कार्यक्रमाला येते. आरोग्य हा माझ्या आवडीचा विषय आहे. मी स्वत: निसर्गोपचारतज्ज्ञ आहे. अशा कार्यक्रमांमुळे काही ना काही नवीन शिकायला मिळते. त्यामुळे हा अतिशय समाजोपयोगी उपक्रम आहे.

अलकनंदा चांदोरकर, ठाणे

फारच छान कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे भरपूर माहिती मिळाली. ‘उदर’मतवाद या व्याख्यानातून आयुर्वेदाची उत्तम माहिती मिळाली.

स्मिता गोखले, मुलूंड