डोंबिवलीत आज ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ गुंतवणूकदार मार्गदर्शन

देशात महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत. सर्वात मोठी कर सुधारणा अर्थात वस्तू व सेवा करप्रणालीची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाली आहे. या करपद्धतीचा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम सांगितले जात आहेत. व्यक्तिगत गुंतवणूकदाराच्या पदरी मात्र यातून कोणते फळ येईल, हा कळीचा प्रश्न आहे. या प्रश्नाचाच ऊहापोह रविवारी, डोंबिवलीत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ गुंतवणूकदार मार्गदर्शन सत्रात होत आहे.

वस्तू व सेवा करपद्धतीची पहाट उगवली. या नव्या करपद्धतीबाबत उत्सुकता आणि हुरहूर अशा संमिश्र भावनांचे प्रतिबिंब भांडवली बाजारातही दिसून आले. परिणामी गेले आठवडाभर शेअर निर्देशांक नरमलेले दिसले. तर जीएसटी लागू झाला त्याच दिवसापासून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीसह, पोस्टाच्या व अल्पबचत योजनांवरील व्याज लाभ हा ०.१ टक्क्य़ांनी घटला आहे.

या चक्रावून टाकणाऱ्या फेरबदलांनी निर्माण केलेल्या कोडय़ाची उकल ‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमांतून तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून केली जाईल. रविवार, २ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता ब्राह्मण सभा सभागृह, टिळक मार्ग, कृष्ण राधा सोसायटी, डोंबिवली (पूर्व) येथे हा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.

बदलत असलेल्या परिस्थितीत उत्पन्न, खर्च आणि बचत यांचा मेळ आणि गुंतवणुकीतून आपल्या आर्थिक स्वप्नांना साकार कसे करावे  हे ‘करावे अर्थनियोजन’ या विषयावरील विवेचन वसंत माधव कुलकर्णी हे करतील. तर शेअर बाजार विश्लेषक अजय वाळिंबे हे गुंतवणुकीसाठी शेअर्स व म्युच्युअल फंड या पर्यायांचा वेध घेताना त्या संबंधाने ध्यानात घ्यावयाचा मुद्दय़ांचा परामर्श घेतील. दोन्ही वक्त्यांना यावेळी श्रोत्यांना त्यांच्या मनांतील गुंतवणूकविषयक शंका  विचारून त्यांचे निरसनही करून घेता येईल. हे गुंतवणूकपर मार्गदर्शन डोंबिवलीकरांसाठी सार्थ ठरावे यासाठी सर्वासाठी प्रवेश खुला आणि विनामूल्य ठेवण्यात आला आहे. मात्र आसन मर्यादा लक्षात घेता, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

untitled-20