‘लोकसत्ता अर्थसल्ला’ रविवारी डोंबिवलीत; आर्थिक नियोजनाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

नोटाबंदीतून सावरलेली अर्थव्यवस्था आता वस्तू व सेवा करप्रणालीला सामोरे जाणार आहे. अर्थसंकल्पाबाहेरील ही घडामोड गुंतवणुकीवर निश्चितच परिणामकारक ठरणार आहे. अशा स्थितीत आर्थिक नियोजन कसे करावे किंवा शेअर बाजारातील गुंतवणुकीचा मेळ कसा राखावा याबाबत मार्गदर्शनासाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ आता रविवारी डोंबिवलीत होत आहे.

xhart

‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ गुंतवणूकदार मार्गदर्शनाचा यंदाच्या पर्वाचा बोरिवलीतून शुभारंभ झाल्यानंतर दुसरे सत्र डोंबिवलीकरांसाठी येत्या रविवारी, २५ जून २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता ब्राह्मण सभाग सभागृह, टिळक मार्ग, कृष्ण राधा सोसायटी, डोंबिवली (पूर्व) येथे पार पडणार आहे.

‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक अजय वाळिंबे आणि वसंत माधव कुलकर्णी यांच्याकडून यावेळी गुंतवणूकदारांच्या शंकांचे निरसनही केले जाणार आहे. सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे असलेले अर्थनियोजन तसेच शेअर बाजारातील व्यवहार यावर मार्गदर्शन या निमित्ताने तज्ज्ञ वक्ते करतील.

नोटाबंदीनंतरची तसेच वस्तू व सेवा करप्रणालीनंतरचे वित्तीय सेवा क्षेत्रातील बदल म्युच्युअल फंड, विमा या गुंतवणूक पर्यायांवर काय बदल घडवून आणू शकतील, याची कल्पना यावेळी उपस्थितांना दिली जाईल. अर्थनियोजन करताना यापुढे लक्ष द्यावयाच्या बाबींवरही भर दिला जाईल. भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक आता त्यांच्या उच्चांकांपासून दूर गेले आहेत. त्यांचा पुढील प्रवास व त्यात व्यवहार करताना गुंतवणूकदारांनी काय धोरण ठेवावे, हेही स्पष्ट केले जाईल.