वाचनाची आवड आहे म्हणून प्रत्येक नवीन आलेले चांगले पुस्तक खरेदी करून वाचणे हे बहुतेकांना जमत नाही. ग्रंथालय नावाचे पुस्तकांचे घर अशावेळी अशा वाचनप्रिय नागरिकांसाठी उपयुक्त ठरते. नागरिक राहत असलेल्या परिसरात एखादे ग्रंथालय असावे, ‘हे गाव तेथे ग्रंथालय’ या संकल्पनेचे धोरण प्रत्येक गाव, शहरांनी अवलंबिले तर अनेक गाव, शहरे विचार आणि बुद्धिमत्तेने श्रीमंत होतील. मात्र आजही काही परिसरात ग्रंथालय नसल्याने अनेक नागरिकांना वाचनापासून वंचित राहावे लागते. सर्वच ठिकाणी सार्वजनिक ग्रंथालये स्थापन करता येतीलच असेही नाही. अशा वेळी खासगी ग्रंथालये त्या परिसरात स्थापन होतात आणि संबंधित परिसरातील वाचनप्रेमी नागरिकांना वाचनासाठी ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन साहित्य उपलब्ध होते.
डोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरात असणारे फ्रेण्ड्स ग्रंथालय या परिसरातील नागरिकांसाठी असेच उपयुक्त ग्रंथालय म्हणावे लागेल. वाचन संस्कृतीचे जतन करणे हे ग्रंथालयाचे मुख्य उद्दिष्ट. मात्र हे उद्दिष्ट लक्षात ठेवून त्याला व्यवसायाची जोड दिली तरी ग्रंथालयाच्या माध्यमातून नागरिकांना कायम ग्रंथसेवा देता येते. डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या राजन भट यांनी एमआयडीसी परिसरात ग्रंथदान आणि ग्रंथालयाच्या माध्यमातून व्यवसाय या दोन्हींचा मेळ साधला आहे. एखादा व्यवसाय म्हटला की प्रचंड पैशांची उलाढाल ओघाने येते. मात्र व्यावसायिक दृष्टिकोन थोडा कमी ठेवून परिसरातील नागरिकांना वाचनसेवा पुरवणारे फ्रेण्ड्स ग्रंथालय उत्कृष्ट ग्रंथसेवेचे कार्य करत आहे. १५ वर्षांपूर्वी राजन भट यांनी एमआयडीसी परिसरात आपल्या ग्रंथालयाची सुरुवात केली. सध्या ग्रंथालयाचा कारभार त्यांच्या पत्नी राधिका भट या सांभाळत आहेत. ग्रंथालय भाडय़ाच्या जागेत असून जास्तीत जास्त मराठी व इंग्रजी पुस्तकांचा भरणा ग्रंथालयात आहे. या दोन्ही भाषेतील १२ हजारांहून अधिक पुस्तके ग्रंथालयात आहेत.
ग्रंथालयाची जागा फारशी मोठी नाही. मात्र मर्यादित जागेत पुस्तकांची नीटनेटकी मांडणी करण्यात आली आहे. ग्रंथालयात प्रवेश केल्यावर राधिका भट आणि त्यांच्या सहकारी हसतमुखाने स्वागत करतात. तेव्हा ग्रंथालयाबद्दल वाचकांच्या मनात आपोआप आपुलकीची भावना निर्माण होते. दर्शनी भागात विविध प्रकारची मासिके ठेवण्यात आली आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच तरंग, सुधा, गृहशोभा ही मासिके ग्रंथालयात उपलब्ध आहेत. कन्नड भाषेतील मासिकांनाही ग्रंथालयात मागणी आहे. तसेच इंग्रजी मासिकांचाही खास वाचक वर्ग आहे. ग्रंथालयाला कोणत्याही प्रकारची देणगी दिली जात नाही. ग्रंथालय पूर्णत: वाचकांच्या वर्गणीवर सुरू आहे. वाचकांच्या वर्गणीतून ग्रंथालयात पुस्तकांची खरेदी केली जाते. नवीन आलेल्या पुस्तकांना कव्हर घालणे, पुस्तके शिवणे यासारखी कामे राधिका भट आणि त्यांच्या सहकारी मिळून करतात.

लेखकांनुसार पुस्तकांची मांडणी
ग्रंथालयात लेखकांनुसार पुस्तकांची मांडणी करण्यात आली आहे. कपाटाच्या प्रत्येक रकान्यावर लेखकाचे नाव लिहिलेली कागद पट्टी चिकटवण्यात आली आहे. वाचक त्यांना हवे असलेले पुस्तक स्वत: निवडून घेऊ शकतात. लेखकांनुसार वर्गीकरण होत असल्याने वाचकांना त्यांच्या आवडीच्या लेखकांची पुस्तके शोधणे सोपे जाते.
त्याचबरोबर साहित्यप्रकारानुसारही पुस्तकांची मांडणी करण्यात आली आहे. आत्मचरित्र, अनुवाद, कथासंग्रह, कादंबऱ्या यासारख्या साहित्यप्रकारानुसार पुस्तके मांडण्यात आली आहेत. ग्रंथालयात स्वतंत्र बालविभाग असून लहान मुलांसाठी वेगवेगळ्या साहित्याचा भरणा त्यात आहे. मात्र सध्या व्हिडीओ गेम्स आणि संगणकच्या युगात ग्रंथालयाकडे बालवाचक वर्ग कमी येतो, अशी खंत राधिका भट यांनी व्यक्त केली. सध्या ग्रंथालयात ३५० हून अधिक वाचक असून त्यांच्या मागणीनुसार पुस्तकांची खरेदी केली जाते. वाचकांशी ग्रंथालयाचे कौटुंबिक संबंध असल्याने काही वाचक उत्साहाने पुस्तकाबद्दल अभिप्राय कळवतात. एखाद्या वयस्कर वाचकांना पुस्तक घेण्यास येणे शक्य नसल्यास ग्रंथालयातील कर्मचारी स्वत: ही पुस्तके घरपोच पोहचवतात. राधिका भट यांना त्यांच्या ग्रंथालयाच्या कारभारात भारती बेडेकर, वीणा जोशी आणि निकिता गुरव या सहकारी मैत्रिणींचा हातभार असतो. ग्रंथालयात १४० रुपये मासिक वर्गणी असून २०० रुपये अनामत रक्कम आहे. एमआयडीसी परिसरात हे एकच ग्रंथालय असून या परिसरातील नागरिकांना वाचनसेवा पुरवत आहे.

– किन्नरी जाधव