सौरभ कुलकर्णी आणि चिन्मय पाटीलला पारितोषिक प्रदान
‘लोकसत्ता’च्या वतीने घेण्यात येणाऱ्या ब्लॉग बेंचर्स स्पर्धेत यशस्वी झालेल्या सौरभ कुलकर्णी यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व प्रमाणपत्र एम. पी. लॉ कॉलेजच्या उपप्राचार्या भाग्यश्री परांजपे-गोडबोले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
‘हकनाक हणमंतप्पा’ या विषयावर लिहिलेल्या ‘ब्लॉगला ७ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. त्याचा धनादेश उपप्राचार्याच्या हस्ते देण्यात आला. माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात प्राध्यापक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रा. दिनेश कोलते, डॉ. अपर्णा कोत्तापल्ले, शीतल बाराते, प्रतिभा गिरमाने तसेच सौरभची आई स्मिता व सुधीर कुलकर्णी उपस्थित होते. ‘लोकसत्ता’चे मुख्य वितरण व्यवस्थापक मुकुंद कानिटकर यांनी या वेळी ‘लोकसत्ता’च्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धाची माहिती दिली. लोकांकिका, वक्तृत्व स्पर्धेतही महाविद्यालयातील तरुण अधिकाधिक सहभागी होतील, असे गोडबोले यांनी सांगितले.

Untitled-1

लोकसत्ता ‘ब्लॉग बेचर्स’ उपक्रमात उपविजेत्या ठरलेल्या चिन्मय पाटील याला शुक्रवारी लोकसत्ता ठाणे कार्यालयात विपणन विभागाचे सरव्यवस्थापक सुब्रतो घोष यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
रोख पाच हजार रूपये आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. चिन्मयने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून कलाशाखेची पदवी संपादन केली आहे. आता समाजसेवा (एम.एस.डब्ल्यू) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या चिन्मयला लेखन करण्याची आवड आहे. ‘युपीएससी’च्या परीक्षेची तयारीही तो करीत आहे. ‘लोकसत्ता’चा नियमित वाचक असणारा चिन्मय अभ्यासाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून लिहिण्याचा छंद जोपासतो. ‘हकनाक हणमंतप्पा’ या सियाचेनचे वास्तव मांडणाऱ्या अग्रलेखावर ब्लॉगच्या माध्यमातून चिन्मयने मत व्यक्त केले होते. ‘लोकसत्ता’ने लिहू इच्छिणाऱ्या युवकांना ब्लॉग बेचर्सद्वारे चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले, अशी प्रतिक्रिया चिन्मय याने व्यक्त केली.