ठाण्यातील अकादमी संचालकाने बिंग फोडले

लष्कर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटणार असून त्यासाठी प्रत्येक परीक्षार्थीकडून चार ते पाच लाख रुपये उकळण्यात आल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. सैन्य भरतीसंबंधी ठाणे जिल्ह्य़ात अकादमी चालवणाऱ्या एका संचालकानेच ही माहिती ठाणे पोलिसांना दिली. शनिवारी सकाळी हा संचालक पोलिसांना भेटला आणि त्याने ही पेपरफुटीची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सर्व चक्रे फिरली.

संबंधित संचालकाने ठाणे जिल्ह्य़ातून सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना काही दलाल येऊन भेटले असून हे दलाल संबंधितांना इतर जिल्ह्य़ांमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी बोगस रहिवास प्रमाणपत्र व परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणार आहेत. त्यासाठी संबंधितांकडून चार ते पाच लाख रुपये घेणार आहेत, अशी माहिती पोलिसांना दिली. त्याआधारे शनिवारी मध्यरात्रीनंतर नागपूर, पुणे आणि गोवा राज्यात धाडी टाकून ही कारवाई केल्याचे पोलीस सहआयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी सांगितले.

व्हॉटसअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका

नागपूर येथील निर्मलनगर, पुणे येथील फुरसुंगी आणि गोव्यातील वाघा बीच या भागातील मोठय़ा हॉलमध्ये परीक्षार्थीना ठेवण्यात आले होते. शनिवारी रात्रीपासूनच हे परीक्षार्थी तिथे जमले होते. या सर्वाना रविवारी होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या १८ पैकी काहीजणांच्या व्हॉटस अ‍ॅपवर ही प्रश्नपत्रिका आली होती. त्याच्या प्रती काढून हॉलमध्ये जमलेल्या परीक्षार्थीना पुरविल्या होत्या.

भरतीची देवाण-घेवाण?

संचालकांनी परीक्षार्थीचे दहावी व बारावी परीक्षेची प्रमाणपत्र स्वत:कडे जमा करून ठेवली होती. भरती झाल्यानंतर हे पैसे घेतले जाणार होते. तसेच पैसे मिळाल्यानंतरच संबंधितांची दहावी व बारावीचे प्रमाणपत्र त्यांना परत केले जाणार होते. पैसे मिळावेत म्हणूनच त्यांनी ही प्रमाणपत्र स्वत: कडे ठेवली होती.