विरार हत्याप्रकरणाला वेगळे वळण

विरारमधील बंद घरात गणेश कोलटकर यांची हत्या करून मृतदेहाचे असंख्य तुकडे करण्यात आले होते. मात्र या प्रकरणाच्या तपासातून नवीन माहिती समोर आली आहे. आरोपी पिंटू शर्मा याने महिलेच्या नावाने बनवाट फेसबुक खाते बनवून मृत गणेश कोलटकर यांची मस्करी केली. होती. त्यामुळेच त्यांच्यात वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात शर्मा याने कोलटकराची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

मीरा रोड येथे राहणाऱ्या गणेश कोलटकर(५८) यांच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे विरारच्या बचराज पॅरेडायस या इमारतीच्या सांडपाण्याच्या नाल्यात सापडले होते. पिंटू शर्मा या त्याच्या मित्रानेच ही हत्या केली होती. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेहाचे ३०० हून अधिक तुकडे केले होते. आर्थिक वादातून ही हत्या केल्याचे तो पोलिसांना सांगत होता. मात्र आता तपासात नवीन माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती देताना विरारचे पोलीस उपअधीक्षक जयंत बजबळे यांनी सांगितले की, गणेश कोलटकर यांना लग्न करायचे होते. त्यासाठी ते मुलगी बघत होते. त्यामुळे कोलटकरांची मस्करी करावी यासाठी पिंटू शर्माने वनिता अग्रवाल या नावाने बनावट फेसबुक खाते बनवले होते. त्यानंतर पिंटू शर्मा मुलीच्या आवाजात वनिता अग्रवाल बनून कोलटकराशी बोलत होता. हत्येच्या दिवशी पिंटू शर्माने वनिता अग्रवालच्या नावाने कोलटकरांना फोन केला आणि भेटायला विरारला बोलावले. जेव्हा कोलटकर त्या इमारतीत गेले, तेव्हा तिथे वनिता अग्रवालऐवजी पिंटू शर्मा दिसला. आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजले आणि त्याने रागाने पिंटू शर्माला मारले. याचवेली पिंटूनेही कोलटकरांना मारून ढकलले. त्यात खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलिसांना सांगितले.

मृत कोलटकरांचा एक मोबाइल जप्त केला आहे. त्यात तो वारंवार वनिता अग्रवाल या महिलेशी वारंवार संवाद असल्याचे दिसले. हा क्रमांक पिंटू शर्माचे असल्याचे उघडकीस झाले आहे. वनिता अग्रवाल या नावाने केलेल्या कॉल्सची ध्वनीफितही पोलिसांना मिळाली आहे, असे पोलीस उपअधीक्षक जयंत बजबळे यांनी सागितले.