तरुणीने प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याचा संशय

विरारच्या नारिंगी येथील मोहन सोनावणे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून त्यांची हत्या करण्यात आल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी सोनावणे यांच्या मुलीवर संशय असून प्रियकराच्या मदतीने तिने हत्या केल्याचा कयास पोलिसांनी बांधला आहे.

विरार पूर्वेच्या नारिंगी येथील सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मोहन सोनावणे (६४) यांनी १४ जानेवारीला राहत्या घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याची माहिती सोनावणे यांचा मुलगा संतोष (३०) याने दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. मात्र सोनावणे यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला नव्हता तर तो जमिनीवर काढून ठेवला होता. त्यांच्या मानेवर आणि डोक्यावर जखमा होत्या. त्यामुंळे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सोनावणे यांच्या मृतदेहाचे दोन वेळा शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाल्याचे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी सांगितले. आम्हाला घटनास्थळावर अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्या. पंख्याला नायलॉनची दोरी होती. ती दोरी सोनावणे यांचा भार उचलू शकत नव्हती, तसेच मृतदेह जमिनीवर होता. मानेवर ज्या खुणा होत्या, त्या गळफासाच्या नव्हत्या. डोक्याला मागून जखम होती. म्हणून आम्ही दोन वेळा शवविच्छेदन केल्याचे शेख यांनी सांगितले. हा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.