19 March 2019

News Flash

आरोपी दुसऱ्याच्याच हत्येसाठी नालासोपाऱ्यात?

नालासोपाऱ्यातील शुभम बुमकच्या हत्येला वेगळे वळण

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नालासोपाऱ्यातील शुभम बुमकच्या हत्येला वेगळे वळण

नालोसापारा येथील शुभम बुमक या तरुणाच्या हत्येला वेगळे वळण मिळाले आहे. पार्टीनंतर मित्रांशी झालेल्या थट्टामस्करीत चुकून गोळी सुटून शुभमचा मृत्यू झाला होता, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र या प्रकरणातील आरोपी शहरात कुणाच्या तरी हत्येची सुपारी घेऊन आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून अन्य दोन फरार आहेत.

ठाण्यात राहणाऱ्या शुभम बुमक (१७) या तरुणाचा शुक्रवारी पहाटे नालासोपारा येथील वनोठीपाडा येथील घरात मृतदेह आढळळा होता. आदल्या दिवशी तो आपल्या मित्रांकडे पार्टीसाठी आला होता. त्यावेळी कैलास वाघ या मित्राकडील पिस्तुलातून गोळी सुटून त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात आढळले होते. या घटनेनंतर कैलास वाघ, दीपक मलिक आणि अनिल सिंग फरार झाले होते. पोलिसांनी कैलास वाघ याला अटक केली होती. चुकून गोळी सुटल्याचे वाघ याने पोलिसांना सांगितले होते. मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मृत शुभम आणि त्याच्या तीन साथीदारांना शहरातील एका व्यक्तीच्या हत्येची सुपारी मिळाली होती आणि त्यासाठी ते शहरात आले होते, अशी माहिती तपासात येत आहे. पोलिसांनी अद्याप त्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. अनेक गोष्टी आहेत, पंरतु त्या तपासाचा भाग आहेत, असे वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले.

शुक्रवारी पहाटे गोळी सुटून शुभमचा मृत्यू झाला होता. मात्र त्याच पहाटे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोशन राजतिलक यांना काही आरोपी हत्या करण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पेल्हार येथून कैलास वाघ याला ताब्यात घेतले. वालीव पोलिसांनी कैलास वाघवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पिस्तुल कुठून आणले आणि का आणले याचा तपास सुरू आहे. मात्र या आरोपींना शहरातील कुणाला तरी मारण्याची सुपारी मिळाली आणि त्यासाठी ते आले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

First Published on June 12, 2018 12:11 am

Web Title: loksatta crime news 84