News Flash

पैंजणांमुळे महिलेच्या हत्येचे गूढ उकलले!

काशिमीरा येथील अर्धवट जळलेल्या मृतदेहाचा तिढा सुटला

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

काशिमीरा येथील अर्धवट जळलेल्या मृतदेहाचा तिढा सुटला

काशिमीरा येथील जंगलात काही दिवसांपूर्वी अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ महिलेच्या पायातील पैंजणांनी उकलले आहे. ही महिला नालासोपारा येथे राहणारी होती आणि अनैतिक संबंधातून तिच्या प्रियकराने तिची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वीच काशिमीरा येथील जंगलात एका महिलेचा अर्धवट स्थितीत जळलेला मृतदेह पोलिसांना सापडला होता. या प्रकरणाचा काशिमीरा पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेनेदेखील तपास सुरू केला होता.

निर्मला यादव नालासोपारा येथे एका व्यक्तीसोबत लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होत्या आणि श्रीराम नगर परिसरात किराणा मालाचे दुकान चालवत होत्या, विवाहित असलेला अब्रार नेहमी त्यांच्या दुकानात येत असे. या ओळखीतूनच त्यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध जुळले.

काही दिवसांनी निर्मला यांनी अब्रारकडे लग्न करण्याचा तगादा लावण्यास सुरुवात केली. परंतु अब्रार नेहमी टाळाटाळ करत असे. अब्रारने लग्न न केल्यास त्याच्या कुटुंबाला प्रेमसंबंधाची माहिती देण्याची धमकी निर्मला यांनी दिली. यानंतर अब्रारने निर्मला यांची हत्या करण्याचा बेत आखला.

१५ जानेवारीला निर्मला पुण्याला नातेवाईकाच्या लग्नासाठी निघाल्या होत्या. वाटेतच त्यांना अब्रारचा फोन आला. लग्नासंबंधी चर्चा करायची असल्याने घोडबंदर येथील फाऊंटन हॉटेलजवळ भेटण्यास अब्रारने त्यांना सांगितले.

दोघे भेटल्यावर अब्रार त्यांना जंगलात घेऊन गेला. त्या ठिकाणी दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि अब्रारने निर्मला यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून निर्मला यांच्यासोबत असलेल्या कपडय़ाची बॅग मृतदेहावर टाकून अब्रारने ती पेटवून दिली आणि हत्या केल्यानंतर तो गुलबर्गा येथील आपल्या गावी पळून गेला. सोमवारी अब्रार नालासोपारा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला पोलिसांनी नालासोपारा रेल्वे स्थानकातच अटक केली.

अर्धवट जळालेल्या कागदावरील मोबाइल क्रमांकावरुन संपर्क

मृतदेहाची तपासणी सुरू असताना घटनास्थळी काही अर्धवट जळलेली कागदपत्रे पोलिसांना सापडली. या कागदपत्रांवर मोबाइल क्रमांक लिहिले होते. त्यातील एका मोबाइलवर पोलिसांनी संपर्क साधला असता तो नालासोपारा येथील एका महिलेचा असल्याचे समजले. या महिलेला मृतदेहाची माहिती दिल्यावर मृतदेहाच्या पायातील पैंजणांवरून या महिलेने तो मृतदेह तिच्या शेजारी राहणाऱ्या निर्मला सचिन यादव या महिलेचा असल्याचे पोलिसांनी संगितले. यानंतर तपास करून पोलिसांनी आरोपी अब्रार मोहम्मद अस्लम शेख या तरुणाला अटक केली.

अब्रारने निर्मालाच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या केली. ओळख पटू नये यासाठी तिच्यासोबत असलेली कपडय़ाची बॅग मृतदेहावर टाकून पेटवून दिली. अब्रारने निर्मला यांच्या हत्येची कबुली दिली आहे.     – प्रमोद बडाख, साहाय्यक पोलीस निरीक्षक

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 3:04 am

Web Title: loksatta crime story 13
Next Stories
1 देहेर्जा प्रकल्पासाठी भूमिपुत्रांचा टाहो
2 रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर
3 तरण तलावांसाठी कूपनलिका?
Just Now!
X