‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमातून तज्ज्ञांचे वसईकरांना आवाहन; केंद्रीय अर्थसंकल्पाचे परखड विश्लेषण
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या करतरतुदी वैचारिक गोंधळ उडवणाऱ्या आहेत. त्यामुळेच त्यांचा अभ्यास करून त्यापासून सावध राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या पैशाचे काय होतेय, हे जाणून घेण्यासाठी अर्थसाक्षर होणेही गरजेचे आहे, असे मत वसईत आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या उपक्रमात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केले. वसईतील बॅसीन कॅथोलिक को-ऑप. बँकेच्या सौजन्याने शनिवारी वसईत पापडी येथील थॉमस बाप्टिस्टा कनिष्ठ महाविद्यालयाच्या कृपामाता सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला वसईकरांनी तुडुंब गर्दी केली होती.
दर वर्षी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्वसामान्य जनतेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निगडित असतानाही त्यातील बोजड शब्द, प्रचंड मोठे आकडे आणि गुंतागुंतीच्या तरतुदी यामुळे सामान्य नागरिक त्याबद्दल अनभिज्ञ राहतात. त्यामुळे या अर्थसंकल्पाचा आपल्यावर किती परिणाम झाला हे त्यांना शेवटपर्यंत कळत नाही. हीच अनभिज्ञता मोडून काढण्यासाठी तसेच सामान्यांना आर्थिक गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी वसईमध्ये ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेअर बाजाराचे अभ्यासक अजय वाळिंबे, सनदी लेखाकार मकरंद हेरवाडकर यांच्यासह ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दोन तासांहून अधिक चाललेल्या या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती. तज्ज्ञमंडळींच्या भाषणानंतर उपस्थितांनी आपल्या मनातील शंका, प्रश्न यांचेही त्यांच्याकडून समाधान करून घेतले.
सनदी लेखाकार मकरंद हेरवाडकर यांनी अर्थसंकल्पाचा आढावा घेताना सरकारने केलेल्या करविषयक तरतुदींचे विश्लेषण केले. नव्या करतरतुदी काय आहेत, त्यामुळे काय फायदे, तोटे होणार आहेत ते त्यांनी उदाहरणासहित या वेळी उलगडवून दाखवले. अर्थसंकल्पातील करतरतुदी वैचारिक गोंधळ उडवणाऱ्या असून तो फसवा असल्याची टीका त्यांनी केली. ‘ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांना एकदाच पंधरा टक्के भरून तो पांढरा करता येणार आहे. पण सर्वसामान्य जनतेला एक महिना जरी उशीर झाला तरी त्यावर एक टक्का दंड आकारला जातो,’ असे ते म्हणाले. हा विरोधाभास वाईट असल्याचेही त्यांनी नमूद केले. अनेक ठिकाणी आमिषे दाखवून पळवाटा शोधण्यात आलेल्या आहेत. त्यांचा अभ्यास करून त्यापासून सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.
अर्थतज्ज्ञ अजय वाळिंबे यांनी अर्थसंकल्पासोबतच शेअर बाजाराचा ‘टाइम’ आणि ‘टाइप’ बघून गुंतवणूक करण्याचा सल्ला उपस्थितांना दिला. वेळ आणि प्रकार या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असून योग्य वेळी केलेली दीर्घकालीन गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरते, असे ते म्हणाले. केंद्रीय अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजावर केलेली करआकारणी हा सर्वात मोठा घाला असल्याची टीका त्यांनी केली.
‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी अर्थसंकल्पाबाबत सोप्या भाषेत माहिती दिली. ‘सर्वसामान्य जनता ही प्रामाणिक करदाती असते. त्यांनी आपल्या पैशांचे काय होते ते जाणून घेण्यासाठी अर्थसाक्षर होणे गरजेचे आहे,’ असे ते म्हणाले. ‘कृषी विभागाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचा दावा करून सहा वर्षांत शेतीचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, त्यासाठी शेतीचा दर १४ टक्के असायला हवा, परंतु, सध्याचा दर अर्धा टक्का असल्याने हे आव्हान कठीण आहे, असे ते म्हणाले.
बॅसीन कॅथोलिक बँकेच्या महाव्यवस्थापिका ब्रिजदिना कुटिन्हो यांनी आपल्या प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तर बँकेचे अध्यक्ष मायकल फुटय़ाडरे यांनी सहकार क्षेत्रातील समस्या मांडल्या. या कार्यक्रमासाठी बँकेचे उपाध्यक्ष ख्रिस्तोफर रॉड्रिक्स, बिनी घोन्साल्विस, रायन फर्नाडिस, टेरा आल्मेडा, ओनिल आल्मेडा, दिलीप माठक, पायस मच्याडो, रुपेश रॉड्रिक्स, प्रा. ट्रिझा परेरा, ब्रायन नरोना आदी संचालक उपस्थित होते. माजी आमदार डॉमनिक घोन्साल्विस, वसईतल्या विविध बँकांचे अध्यक्ष, संचालक यांनीही आवर्जून हजेरी लावली होती.

अर्थसंकल्प शेअर बाजाराला दिलासा नाहीच. परंतु मध्यमवर्गीयांनादेखील नाराज करणारा आहे. पंधरा टक्के भरून काळा पैसा एकदाच पांढरा करण्याची तरदूत करण्यात आलेली आहे, परंतु सर्वसामान्य पांढरा पैसा असणाऱ्या करदात्यांना महिना जरी उशीर झाला तरी एक टक्का दंड आकारला जातो ही तफावत अन्यायकारक आहे.
– अजय वाळिंबे, अर्थतज्ज्ञ

श्रीमंतांचा कराचा दर हा नेहमी कमी असतो. आपण ‘ट्रिपल टॅक्सेशन’कडे चाललेलो आहोत. प्रगतीच्या ऐवजी अधोगतीकडे चाललो आहोत. ही करप्रणाली लाभांश वितरण कराची आहे. प्राप्तिकर खात्यात कुठलेही दावे प्रलंबित असतील आणि त्यांनी कर भरला तर संपूर्ण दावे निकालात काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पण मुळात त्याने कर का भरावा हा प्रश्न आहे.
– मकरंद हेरवाडकर, सनदी लेखाकार

उपकरांबाबत सर्वसामान्य जनता अनभिज्ञ असते. सरकारने तीन उपकर रद्द करून १३ नवीन उपकर लावले आहेत. त्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली जाते. अगदी बांगलादेश युद्धाचा अधिभार बेस्टच्या तिकिटातून वसूल केला जातो. जीएसटी कर आपल्याकडे लागू झाल्यास जगणे सुसह्य होईल.
– गिरीश कुबेर, संपादक, लोकसत्ता

प्रथमच वसईकरांना एवढा सुंदर कार्यक्रम पाहायला मिळाला. अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने जनतेला समजला. उत्तर वसईतदेखील अशा ‘अर्थसल्ला’च्या कार्यक्रमाचे आयोजन करायला हवे. जेणेकरून सर्वाना त्याचा लाभ घेता येईल. विश्लेषण अतिशय सुरेख झाले. किचकट अर्थसंकल्प सोप्या भाषेत सांगण्याची गिरीश कुबेर यांची शैली वाखाणण्याजोगी आहे.
-शैलेंद्र रॉड्रिक्स, नंदाखाल विरार

अर्थसंकल्पाचे विश्लेषण अतिशय चांगल्या पद्धतीने झाले. असे कार्यक्रम वसईत नियमित व्हायला हवेत. राज्याच्या आणि पालिकांच्या अर्थसंकल्पावरही चर्चा व्हायला हवी. करविषयक तरतुदी कशा होत्या, कुठे गुंतवणूक करावी हे समजले. गिरीश कुबेर यांनी अर्थसंकल्पाचे नेमके मर्म उलगडवून दाखवले
-पायस मच्याडो, संचालक, बॅसीन कॅथोलिक बँक

अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला. ‘लोकसत्ता’मधून संपादक नियमितपणे अर्थविषयक अचूक विश्लेषण करत असतात. आर्थिक विश्लेषणात ‘लोकसत्ता’ नेहमीत अग्रेसर आहे. त्यामुळे वसईकरांना त्यांनी मार्गदर्शन करावे असे आम्हाला वाटत होते. या निमित्ताने वसईकरांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारी.
-मायकल फुटय़ाडरे, अध्यक्ष, बॅसीन कॅथोलिक बँक

असा उत्तम कार्यक्रस सादर केल्याबद्दल ‘लोकसत्ता’ आणि त्यांच्या संपूर्ण टिमचे आभार. एरवी अर्थसंकल्प समजायला कठीण असतो, परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो आम्हाला समजून घेता आला. अतिशय उपयुक्त माहिती आम्हाला मिळाली.
– रॉजर रॉड्रिक्स