News Flash

संगीतसरींनी मीरा-भाईंदरकरांची श्रावण संध्याकाळ चिंब

‘लोकसत्ता’च्या‘घन आज बरसे’ संगीत कार्यक्रमाला रसिकांची गर्दी

‘घन आज बरसे’ कार्यक्रमात गायिका मुग्धा वैशंपायन, डॉ. श्रीरंग भावे यांनी गीते सादर केली. तर उत्तरा मोने यांनी सूत्रसंचालन केले.

‘लोकसत्ता’च्या‘घन आज बरसे’ संगीत कार्यक्रमाला रसिकांची गर्दी

भाईंदर : श्रावणातील हलक्या पावसाच्या सरी, आकाशात इंद्रधनुषी रंगांची उधळण आणि निसर्गाला आलेला बहर अशा वातावरणात ‘लोकसत्ता’तर्फे ‘घन आज बरसे’ हा संगीताचा कार्यक्रम रंगला. आनंददायी वातावरणात अवीट गीतांच्या पावसात मीरा-भाईंदरमधील रसिक न्हाऊन निघाले. या कार्यक्रमाला ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी मोठी गर्दी केली होती. गायिका मुग्धा वैशंपायन आणि डॉ. श्रीरंग भावे यांनी सादर केलेल्या श्रावणगीतांनी रसिकांची सायंकाळ भिजून गेली. भाईंदर पूर्वेकडील इंद्रलोक येथील प्रमोद महाजन सभागृहात रविवारी सुरेल गीतांची मैफल रंगली.

‘घन आज बरसे अनावर हो’, ‘नभ उतरू आले’, ‘हिरवा निसर्ग हा भवतीने’, ‘घन निळा बरसला’, ‘वादळ वारं सुटलं गं’, ‘असा बेभान हा वारा’, ‘बाई या पावसानं’, ‘घन घन माला नभी दाटल्या’, ‘आला आला वारा’ ही गाणी सादर करण्यात आली. लता मंगेशकर, आशा भोसले यांनी सुरेल आवाजांनी अजरामर केलेली, पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरसाजाने सजलेली, गदिमा, पुलं, मंगेश पाडगावकर यांनी शब्दबद्ध केलेली आणि पंडित वसंतराव देशपांडे यांच्या गळ्यात अजरामर झालेल्या गीतांनी रसिकांच्या मनावर गारुड केले.

मराठी गीतांसह हिंदीतील ‘रिम झिम गिरे सावन’, ‘सावन का महिना’ ही गीतेही कलावंतांनी सादर केली. प्रेक्षकांना संस्कृती आणि साहित्याची माहिती देत असतानाच पाऊस हा प्रेमाचे प्रतीकही असतो. हे गायकांनी गाण्यांमधून दर्शवले. ‘अबके सावन ऐसे बरसे’ या गाण्यावर प्रेक्षकांनी ठेका धरला.

उत्तरा मोने यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनी प्रत्येक गीताचे संदर्भ त्यामागचा इतिहास समजावून सांगितला. त्यामुळे कार्यक्रमात रंगत आली. गदिमा, पुलं, मंगेश पाडगावकर यांच्या ‘वेंगुल्र्याचा पाऊस’, ‘सर सर श्रावण आला रे’, ‘मी तिला विचारलं’, ‘भिजून गेले पंख तरीही’ कविता सादर करून प्रेक्षकांना साहित्याची माहिती दिली. वादकांनी वाद्य चालीवरील गाणी सादर केली. गायकांना साथ देण्यासाठी की-पॅडवर जयंत पवार, बासुरी प्रणव हरिदास, ऑटोपॅडवर सिद्धार्थ कदम, तर सिद्धार्थ शिर्के यांनी ढोलकीवादन केले. ‘राणी माझा मळ्यामंदी’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रमुख पाहुणे म्हणून पालिका आयुक्त बालाजी खतगांवकर, नवघर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम बालसिंग उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 3:17 am

Web Title: loksatta ghan aaj barse music concert get huge response zws 70
Next Stories
1 ठाणे काँग्रेसमधील फूट चव्हाटय़ावर
2 बेकायदा कचराभूमीप्रकरणी  उल्हासनगर महापालिकेला नोटीस
3 पुण्यतिथी विशेष: ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या खास गोष्टी
Just Now!
X