News Flash

गर्भवतीची ठाण्यापर्यंत फरफट

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठीच्या वैद्यकीय सुविधांचा अभाव

प्रतिकात्मक छायाचित्र

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठीच्या वैद्यकीय सुविधांचा अभाव

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका गर्भवतीला शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांनी अचानक ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे नातेवाईकांची तारांबळ उडाली. गेल्या बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.

पश्चिमेकडील उमेशनगरमधील चाळीत राहणाऱ्या स्वाती नीलेश वायंगणकर यांची प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात आगाऊ नोंदणी करून ठेवण्यात होती. बुधवारी या महिलेला त्रास होऊ लागल्याने ती नेहमीप्रमाणे शास्त्रीनगर रुग्णालयात गेली, परंतु तेथे डॉक्टरांनी तिला दाखल करून घेण्यात असमर्थता दर्शवली. आणि ठाण्यातील नागरी रुग्णालयात दाखल करण्याची सूचना शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांनी केली. या निर्णयाने वायंगणकर कुटुंबीयांच्या काळजीत भर पडली. अखेर कोणताही धोका नको म्हणून कुटुंबीय संबंधित महिलेसह शास्त्रीनगर रुग्णालयातून बाहेर पडले. सध्या शास्त्रीनगर रुग्णालयातील अशाप्रकारचे रुग्ण ठाण्यात पाठविण्याचे प्रकार वाढले असल्याचे समजते. या रुग्णालयात शहरातील झोपडपट्टी, महापालिका परिसर व २७ गावांतील रुग्ण उपचारासाठी येतात.

रुग्णालयात समस्या

शास्त्रीनगर रुग्णालयात अपघात कक्ष, अतिदक्षता विभाग, सीटीस्कॅन विभाग नाही. पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. त्यामुळे रुग्णसेवा देताना अडचणी येतात, अशी माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने ‘मनसे’च्या शिष्टमंडळाला गेल्या आठवडय़ात दिली होती. या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात म्हणून प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने प्रशासनाला कळविले आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेला पुढे का पाठविले याची माहिती घेतो. शास्त्रीनगर रुग्णालयातील एका स्त्रीरोगतज्ज्ञाने स्वेच्छानिवृत्ती अर्ज दिला आहे. चक्राकार पद्धतीने रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध असतात. संबंधित गर्भवती महिला रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तेथे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर उपस्थित नसतील तर ही अडचण येऊ शकते. याबाबत सविस्तर माहिती घेतो.  -डॉ. राजू लवांगरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी कडोंमपा

  • मागील तीन वर्षे डॉ. स्मिता रोडे वैद्यकीय विभागाच्या प्रमुख होत्या. त्यामुळे यापूर्वी पालिका रुग्णालयात सुरू असलेले गैरप्रकार त्यांनी बंद केले होते. रुग्णालयात शिस्त आणून रुग्ण उपचाराबाबत कोणतीही तक्रार येता कामा नये याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. त्यामुळे शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयातील रुग्णसेवेबाबत तक्रारी कमी येत असत.
  • डॉ. स्मिता रोडे गेल्या आठवडय़ात निवृत्त झाल्यानंतर रुग्णालयातील अनागोंदी कारभार सुरू होण्याची भीती काही ज्येष्ठ नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. रुग्णसेवेपेक्षा फक्त डॉक्टर नेमणुका आणि रुग्णालयातील राजकारणात अधिकारी, डॉक्टरांनी वेळ दवडला तर याप्रकरणी आयुक्तांकडे तक्रार करण्यात येईल, असेही या नगरसेवकांनी सांगितले.
  • रुग्णालय व्यवस्थापन, उपचार पद्धतीवर पालिका कोटय़वधी रुपये दरवर्षी खर्च करते. दोन वर्षांपासून विशेष तज्ज्ञ डॉक्टर भरतीची प्रक्रिया करण्यात येत आहे. तरीही पालिका रुग्णालयात रुग्णांची परवड का केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 12:18 am

Web Title: loksatta health news 2
Next Stories
1 चिखलोलीचे मारेकरी कोण?
2 कचरा विल्हेवाटीचा विडा!
3 विकासकाच्या खोदकामाने रस्ता खचला
Just Now!
X