05 August 2020

News Flash

ठाण्यात शनिवारी ‘इंद्रधनू लोकसत्ता रंगोत्सव’

यंदा हा सोहळा शनिवार, १८ जानेवारी रोजी गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ५ वाजल्यापासून रंगणार आहे.

ठाणेकरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; ‘नटसम्राटाला आदरांजली’ व माय मराठीतले हिरे हा संगीतमय कार्यक्रम

ठाणे : ठाण्यातील सांस्कृतिक वर्तुळात मानाचा समजला जाणारा ‘इंद्रधनू लोकसत्ता रंगोत्सव’ सोहळा येत्या १८ जानेवारी रोजी ठाण्यातील गडकरी नाटय़गृहात रंगणार आहे. संगीत कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी, विविध मान्यवरांच्या उपस्थितीने रंगणाऱ्या या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत नावीन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या तरुणांना युवोन्मेष पुरस्कार तसेच ठाणे मानबिंदू पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या रंगोत्सवाचे यंदाचे २४वे वर्ष आहे.

ठाणे शहरातील सांस्कृतिक चळवळीत इंद्रधनू संस्थेच्या कामाला वेगळे महत्त्व आहे. या संस्थेमार्फत दरवर्षी वेगवेगळे उपक्रम तसेच कार्यक्रम राबविले जातात. वर्षांतून एकदा रंगणारा इंद्रधनू रंगोत्सव सोहळा हा ठाणेकरांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रिबदू राहिला आहे. यंदा हा सोहळा शनिवार, १८ जानेवारी रोजी गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ५ वाजल्यापासून रंगणार आहे. हा सोहळा लोकसत्ताच्या सहकार्याने होत आहे. यंदाचा रंगोत्सव दोन सत्रांत पार पडणार आहे.

पहिल्या सत्रात ‘नटसम्राटाला आदरांजली’ या दृक्श्राव्य, संगीतमय कार्यक्रमाद्वारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मानवंदना देण्यात येणार आहे. या मानवंदना कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन, सागर तळाशिलकर, संवादिनी वादक अमित पाध्ये, मकरंद जोशी यांचा समावेश असणार आहे. दुसऱ्या सत्रात हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी प्रतिभावंतांचे योगदान या संकल्पनेवर आधारित ‘माहीरे’ अर्थात माय मराठीतले हिरे हा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. व्ही. शांताराम, सी. रामचंद्र, मंगेशकर कुटुंबीय, खोटे कुटुंबीय, नूतन, तनुजा, माधुरी, स्मिता पाटील, अमोल पालेकर, आशुतोष गोवारीकर, नितीन देसाई या आणि अशा असंख्य मराठी दिग्गजांचा हिंदी चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत महत्त्वाचा सहभाग आहे. पडद्यावरील आणि पडद्यामागील प्रतिभावंतांच्या कर्तृत्वाचा वैशिष्टय़पूर्ण आढावा या संगीतमय कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. कमलेश भडकमकर यांच्या संगीत संयोजनात होणाऱ्या या कार्यक्रमात आजचे आघाडीचे गायक कलावंत शरयू दाते, अमृता नातू, जयदीप बगवाडकर, नचिकेत देसाई, कृतिका बोरकर सहभागी होणार आहेत. संहितालेखन आणि निवेदन सिनेपत्रकार ललिता ताम्हणे यांचे असून त्यांच्यासोबत अभिनेते पुष्कर श्रोत्री निवेदन करणार आहेत. सहा तासांचा हा भव्य दिव्य सोहळा रसिकांसाठी संगीत, नाटय़, साहित्याची मेजवानी ठरणार आहे.

रंगोत्सवात पुरस्कार सोहळ्याचेही आयोजन

या सोहळ्यानिमित्ताने पुरस्कार सोहळाही संपन्न होणार आहे. या वेळी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींना युवोन्मेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवणाऱ्या एका ज्येष्ठ ठाणेकर व्यक्तीला प्रतिवर्षी इंद्रधनूतर्फे ‘ठाणे मानबिंदू’ या पुरस्काराने गौरविण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 2:48 am

Web Title: loksatta indradhanush rang utsav event in thane zws 70
Next Stories
1 मटण दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक
2 वसईचे समाजरंग : घरांची रचना, पारंपरिक वापरातील वस्तू
3 मेट्रोसाठी पूल पाडणार?
Just Now!
X