News Flash

दातांविषयी आजही समाजात अज्ञान

आठवडय़ाची मुलाखत : डॉ. विश्वास पुराणिक राष्ट्रीय अध्यक्ष,भारतीय दंतवैद्यक संघटना

आठवडय़ाची मुलाखत : डॉ. विश्वास पुराणिक राष्ट्रीय अध्यक्ष,भारतीय दंतवैद्यक संघटना (इंडियन डेन्टल असोसिएशन)

सामाजिक सेवेबरोबर २५ वर्षे दंतवैद्यक क्षेत्रात सेवा देणारे डोंबिवलीकर रहिवासी सुप्रसिद्ध दंत-शल्यचिकित्सक डॉ. विश्वास पुराणिक यांची ‘भारतीय दंतवैद्यक संघटने’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. डोंबिवली दंतवैद्यक संघटनेचे अध्यक्ष असताना ‘उत्कृष्ट शाखा’ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. दंतवैद्यक क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना ब्राह्मण सभेने ‘धन्वंतरी पुरस्कारा’ने सन्मानित केले आहे. पुढील वर्षभर ते भारतीय दंतवैद्यक संघटनेचे अध्यक्षपद सांभाळणार आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद..

  • राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर आपण कोणते उपक्रम हाती घेतले आहेत?

डोंबिवली आता मोठे शहर झाले आहे. शहरी रुग्णांबरोबर ग्रामीण भागातील दातांचे दुखणे असलेला दंत रुग्ण या सेवेच्या माध्यमातून आपणास पाहण्यास व उपचारासाठी मिळाला. दंत रुग्णांवर उपचार करताना एक अनुभव आला, तो म्हणजे दात दुखायला लागल्यावरच बहुतेक जण डॉक्टरांकडे येतात. इतर वेळी दाताचे काम फक्त अन्नाचे चर्वण करणे एवढेच आहे, असाच लोकांचा समज आहे. इतर महत्त्वाच्या इंद्रिय, अवयवांबरोबर दात हाही शरीरातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याची नियमित निगा राखली पाहिजे. याविषयी समाजात खूप अज्ञान आहे. हे अज्ञान दूर करण्यासाठी ‘भारतीय दंतवैद्यक संघटने’च्या (इंडियन डेंटल असोसिएशन-आयडीए) माध्यमातून दातांच्या आरोग्याची काळजी याविषयी जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आहेत.

  • या जनजागृती उपक्रमांविषयी थोडक्यात माहिती द्याल का ?

‘आयडीए’च्या देशात राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर शाखा, उपशाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून संघटित असलेल्या दंतवैद्यकांच्या बैठका घेऊन, त्यांना दंतरुग्णांवर उपचार करतानाच; त्यांचे प्रबोधन कसे करायचे याची माहिती देणार आहे. प्रत्येक दंतवैद्यकाने आपल्या पातळीवर समाजाच्या विविध स्तरांत जाऊन दातांचे महत्त्व आणि घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन शिबीर घ्यावे, यासाठी सूचित केले जाईल. पत्रके वाटप करणे. समाजाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन लोकांशी दातांच्या आरोग्याविषयी चर्चा, मार्गदर्शन करण्यात येईल. दात हे अन्न चावून खाण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असले तरी, दात हा सौंदर्य वाढविण्यातील महत्त्वाचा घटक आहे. चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यात दात हातभार लावतात. दात वेडेवाकडे असले तर त्या व्यक्तीला, मुलाला टिंगलटवाळीला सामोरे जावे लागते. हे सगळे टाळायचे असेल तर दातांची निगा राखण्यासाठी स्थानिक संघटना, संघटनेच्या मुख्यालय सभागृहात कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

  • दंतवैद्यकांच्या प्रबोधनासाठी कोणते प्रकल्प हाती घेणार आहात ?

दंतरुग्णांवर उपचार करण्यासाठी देश, परदेशात जी नवीन उपचार पद्धती, नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे, त्याची माहिती गाव पातळीवरील दंतवैद्यकांना मिळाली पाहिजे; यासाठी देश, परदेशातील दंतवैद्यक क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. दंतवैद्यक क्षेत्रात उपचारासाठी नवनवीन उत्पादित होणाऱ्या साधनांची माहिती मिळविण्यासाठी दंतवैद्यक क्षेत्रातील उत्पादक कंपन्यांचे दृक्श्राव्य (डेन्टल शो) कार्यक्रम आयोजित करणार आहोत. दातांवर उपचार करणाऱ्या साधनांची निर्मिती करणाऱ्या विविध कंपन्यांची एकत्रित  माहितीपर प्रदर्शने (ट्रेड एक्झिबिशन) भरवली जाणार आहेत.

  • शालेय विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रम आहेत का?

लहान मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. बहुतेक मुले दात स्वच्छ धुवत (ब्रशिंग) नाहीत. रात्रीच्या वेळेत झोपताना मुलांना साखर, दूध किंवा अन्य प्रोटिनयुक्त गोड पदार्थ दिला जातो. मुले चॉकलेटसारखे तत्सम पदार्थ खातात. त्यानंतर स्वच्छ तोंड धुतले जात नाही. त्यामुळे दात किडण्याचे प्रमाण वाढते. दात किडल्यावर नवीन दात येतील, म्हणून पालक मुलांच्या दातांकडे दुर्लक्ष करतात. मग येणारे दात वेडवाकडे, फाळे स्वरूपात येतात. मुलांचे व्यक्तिमत्त्व, सौंदर्य दातांवरही अवलंबून असते. याचे भान अनेकदा पालकांना नसते. मग, शाळा, महाविद्यालयात त्या विद्यार्थ्यांला दातांवरून टोमणे मारणे सुरू झाले, की त्यानंतर पालक, विद्यार्थी जागृत होतात. हे दातांचे किडणे वेळीच रोखले जावेत, आपला चेहरा, व्यक्तिमत्त्वातील सौंदर्य टिकवण्यासाठी दात किती महत्त्वाचे आहेत, हे पटविण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेणार आहोत.

  • सर्वसामान्यांना दातांचा काय त्रास असू शकतो?

संपूर्ण शरीराच्या तुलनेत तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त म्हणजे ४० टक्के आहे. अनेक वेळा काही न करता दात दुखायला लागतो. किरकोळ उपचार करून ते दुखणे बंद होते. नंतर पुन्हा दात हालणे, दुखणे सुरू होते. या दुखण्याचे बारकाईने निदान केल्यानंतर दंतरुग्णाला तोंडाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्नहोते. तोंडाच्या कर्करोगाचे पहिले निदान दंतवैद्यकाकडे होते. तंबाखू, चुना, मावा खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहेत. तोंडात दात नसल्याने अनेक वेळा चर्वण करताना कानाजवळील सांधेजोडांवर(जॉइंट) भार येऊन डोकेदुखी सुरू होते. हा आजार थांबवण्यासाठी वेदनाशामक गोळ्या खाल्ल्या जातात. त्याचा परिणाम किडनीवर होतो.

  • भविष्यातील दत्तवैद्यकांसाठी काही योजना आहेत का?

अनेक विद्यार्थ्यांना दंतवैद्यक होण्याची इच्छा असते. परंतु, खर्चीक शिक्षणामुळे त्यांना नामवंत दंतवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणे जमत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी ‘आयडीए’ दंतवैद्यक विषयक प्रात्यक्षिक कृती अभ्यासक्रम तयार करणार आहे. संबंधित अभ्यासक्रम ‘महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठा’च्या माध्यमातून सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. एका अधिकृत विद्यापीठातून शिक्षण घेतल्याचे समाधान, त्याचबरोबर आपली दंतवैद्य होण्याची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांना मिळेल. या माध्यमातून ‘बीडीएस’, ‘एमडीएस’ झालेले नवोदित दंतवैद्यक शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी उपलब्ध होतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 2:34 am

Web Title: loksatta interview with dr vishwas puranik
Next Stories
1 ‘घरच्या घरी विसर्जना’चा प्रयोग फसला
2 एक गाव.. एक मिरवणूक!
3 आवाजी मंडळांवर बडगा!