दुसऱ्या टप्प्यातील एकांकिका आज

उत्कृष्ट सादरीकरणासाठी तरुण कलाकारांची शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेली धडपड, संवादकौशल्य, नेपथ्याची जुळवाजुळव करत रंगभूमीला केलेले अभिवादन असे चित्र ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धेच्या ठाणे विभागीय फेरीच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाले. महाविद्यालयीन तरुणाईला नाटय़कौशल्य सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेतील ठाणे विभागीय प्राथमिक फेरी शनिवारी उत्साहात झाली. याच फेरीचा दुसरा भाग रविवारी (२ डिसेंबरला) होईल.

‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ या स्पर्धेच्या ठाणे विभागीय प्राथमिक फेरीचा पहिला टप्पा ठाण्यात शनिवारी झाला. या पहिल्या टप्प्यात शहाड येथील मातोश्री वेलबाई हरिया महाविद्यालय, कल्याण मधील बी.के. बिर्ला महाविद्यालय, उरणचे कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय आणि गोवेलीतील जीवनदीप महाविद्यालय तसेच बेलापूरच्या डॉ. डी. वाय. पाटील या महाविद्यालयांनी एकांकिका सादर केल्या. शनिवारी सकाळपासूनच महाविद्यालयीन कलाकार डेरेदाखल झाले होते. कमीतकमी साधनसामग्री वापरून महाविद्यालयीन कलाकारांनी विविध विषयांचे नाटय़ाविष्कार सहज सादर केले आणि आपल्यातील नाटय़जाणिवांचे दर्शन घडविले.

समाज, संस्कृती आणि तरुणाई यावर भाष्य करणारी ‘जो बाळा जो जो रे जो’ एकांकिका कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाने सादर केली. मानवी हस्तक्षेपामुळे जंगलांचा होणारा ऱ्हास आणि वाघांचे नष्ट होत चाललेले अस्तित्व यावर आधारित ‘वाघाबो’ नावाची एकांकिका जीवनदीप महाविद्यालयाने सादर केली. डॉ. डी. वाय. पाटील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाने ‘पॉज’ तर बी.के.बिर्ला महाविद्यालयाने ‘कपल गोल्स’ ही एकांकिका सादर केली. ‘कपल गोल्स’ सध्याच्या नातेसंबंधांवर भाष्य करणारी एकांकिका होती. तिने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. संपत चाललेली माणुसकी या विषयावर ‘हृदयशून्य’ ही एकांकिका मातोश्री वेलबाई हरीया महाविद्यालयाने सादर केली.

ठाणे विभागीय प्राथमिक फेरीसाठी लेखक राजीव जोशी आणि नाटककार सुरेश जयराम यांनी परीक्षक म्हणून काम पाहले. सादरीकरणादरम्यान ‘आयरिस प्रॉडक्शन’चे सुवर्णा राणे आणि मधुरा महंत यांचेही मार्गदर्शन कलाकारांना लाभले. रविवारी प्राथमिक फेरीचा दुसरा टप्पा होणार आहे.

विद्यार्थी म्हणतात..

या स्पर्धेसाठी तीन महिन्यांपासून सराव करत होतो. ‘लोकांकिका’चे हे माझे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे खुप उत्सुकता होती. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर प्रयोग सादर करायला मिळाला हे माझे भाग्य समजतो. आता निकालाची उत्सुकता आहे.    – जयकेश मिश्रा (बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण)

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत सहभागी होण्याचे हे दुसरे वर्ष आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही महत्त्वाची स्पर्धा असून त्यानिमित्ताने महाविद्यालयातील कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळते. या भव्य मंचावर कला सादर करता आली ही अभिमानाची बाब आहे.   – शौनक अय्यर (डॉ. डी. वाय. पाटील जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, बेलापूर)