‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी आज; ठाण्याची ‘लोकांकिका’ ठरण्यासाठी चार महाविद्यालयांत चुरस
दर्जेदार संवाद, उत्कृष्ट अभिनय आणि लक्ष्यवेधी नेपथ्य यांची सांगड घालून ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या ठाणे विभागीय अंतिम फेरीत स्वतला सिद्ध करण्यासाठी प्राथमिक फेरीतून निवडण्यात आलेल्या महाविद्यालयांचे चमू सज्ज झाले आहेत. आज, गुरुवार १२ डिसेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे या चार महाविद्यालयांमध्ये चुरस रंगणार आहे. ठाणे विभागीय अंतिम फेरीत सादर होणाऱ्या या एकांकिका विविध सामाजिक आशयांनी युक्त असून प्रेक्षकांच्या मनोरंजनासोबत प्रबोधनात्मकही ठरणार आहेत.
महाविद्यालयीन जगतात नाटय़प्रेमी तरुणाई आतुरतेने ज्या स्पर्धेची वाट पाहत असते त्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी आज, गुरुवार १२ डिसेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे दुपारी ३ वाजल्यापासून रंगणार आहे. या फेरीसाठी निवडण्यात आलेल्या एकांकिकेतील विद्यार्थीही उत्तम सादरीकरणासाठी सज्ज झालेले आहेत. अंतिम टप्प्यात अभिनय, संवाद, वेशभूषा आणि नेपथ्य या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले जात असतानाच दुसरीकडे एकांकिकेच्या मूळ विषयाचे गांभीर्य हरवता कामा नये यासाठी एकांकिकेच्या विषय सादरीकरणाची देखील विशेष काळजी घेतली जात असल्याचे कलाकार सांगत आहेत.
ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘भोकरवाडीचा शड्डू’ ही एकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली आहे. या एकांकिकेचा विषय द. मा. मिरासदार यांच्या ‘हसणावळ’ या पुस्तकातील ‘कोणाचा कोण’ या कथेवर आधारित असल्याचे या एकांकिकेचा दिग्दर्शक अजय पाटील याने सांगितले. सध्या समाजात महिलांवर अत्याचार होत आहेत, महिलांचे शोषण केले जात आहे, यावर आळा बसावा यासाठी या एकांकिकेतील द्रौपदी कशाप्रकारे पुरुषांशी लढा देते याचे चित्र या एकांकिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचेही अजयने सांगितले.
उरण येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाची ‘हमीनस्तू’ ही एकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली आहे. ही एकांकिका काश्मीर प्रश्नावर भाष्य करणारी आहे. काश्मीरमधील नागरिक सध्या जी परिस्थिती अनुभवत आहेत त्यावर ही एकांकिका भाष्य करते, असे एकांकिकेतील कलाकार गौरव सरफरे याने सांगितले.
डोंबिवली येथील मॉडेल महाविद्यालयाची ‘सतराशे साठ दलिंदर’ ही एकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर सध्या कोणी भाष्य करताना दिसून येत नाही. एका बेस्ट कर्मचाऱ्याची आर्थिक परिस्थिती या एकांकिकेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असे एकांकिकेची दिग्दर्शक शिवाली चौधरी हिने सांगितले.
उल्हासनगर येथील एसएसटी महाविद्यालयाची ‘हित्यास भूगोल’ ही एकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली आहे. जागतिकीकरणाकडे जात असताना आज आपण आपल्या गावांचा, ग्रामीण भागांचा इतिहास विसरलेलो आहोत. याच इतिहासाचा शोध घेणारी ‘हित्यास भूगोल’ ही एकांकिका आहे. असे या एकांकिकेचा दिग्दर्शक राहुल शिरसाठ याने सांगितले.
प्रायोजक
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत, ‘लोकसत्ता लोकांकिका २०१९’ या स्पर्धेचे ‘मे. बी.जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकिज’ हे सहप्रायोजक आहेत. तर, ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटरटेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ हे पावर्डबाय पार्टनर आहेत. तसेच, ‘रणथंबोर सफारी’ आणि ‘ईशा नेत्रालय’ हे या स्पर्धेचे रिजनल पार्टनर आहेत. लोकसत्ता लोकांकिकेच्या कलाकारांना चित्रपट-मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेंट पार्टनर असून ‘अस्तित्व’च्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2019 1:54 am