स्वत:मधील सर्जनशील कलेला रंगभूमीची जोड देऊन वैविध्यपूर्ण एकांकिका सादर करण्याचा प्रयत्न ठाणे विभागातील विविध महाविद्यालयांच्या कलाकारांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावरून केला. शनिवारी या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा पहिला टप्पा झाल्यानंतर दुसरा टप्पा रविवारी मोठय़ा उत्साहात पार पडला.

‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेच्या ठाणे विभागातील दोन टप्प्यांत भाग घेतलेल्या महाविद्यालयांपैकी उल्हासनगर येथील एस.एस.टी. महाविद्यालयाची ‘हित्यास भूगोल’, डोंबिवली येथील मॉडेल महाविद्यालयाची ‘सतराशे साठ दलिंदर’, ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘भोकरवाडीचा शड्डू’ आणि उरण येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाची ‘हमीनस्तू’ या चार एकांकिका ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या आहेत. ठाणे विभागात अव्वल ठरलेल्या चार एकांकिकेतील चुरस गुरुवार, १२ डिसेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे दुपारी ३ वाजल्यापासून रंगणार आहे.

ठाण्यात प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने स्मशानभूमीत राहणाऱ्या एका कुटुंबातील पती-पत्नीच्या आयुष्यावर भाष्य करणारी ‘सुलू’ ही एकांकिका सादर केली. माणुसकी आणि पैसा यांमधील फरक स्पष्ट करणारी ‘तुला देतो पैसा’ ही एकांकिका उरण येथील वीर वाजेकर महाविद्यालयाने सादर केली. बेस्ट कामगारांचा संप आणि घरात ढेकणांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे खालावलेली आर्थिक परिस्थितीच्या गैरसमजुतीवर भाष्य करणारी ‘सतराशे साठ दलिंदर’ ही एकांकिका डोंबिवली येथील मॉडेल महाविद्यालयाने सादर केली.

ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाने स्त्रीशोषण आणि त्याविरुद्ध लढा देणाऱ्या खेडेगावातील स्त्रीचे अस्तित्व ‘भोकरवाडीचा शड्डू’ या एकांकिकेतून परीक्षकांसमोर मांडले. काश्मीर प्रश्नावर भाष्य करणारी ‘हमीनस्तू’ ही एकांकिका उरण येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाने सादर केली.

कोपरखैरणे येथील लोकमान्य टिळक अभियांत्रिकी महाविद्यालयाने समलैंगिक संबंधावर भाष्य करणारी ‘सोपं बट अनएक्सपेक्टेड’ ही एकांकिका सादर केली. दुष्काळ आणि त्यातील एक प्रेमकथा दर्शवणारी ‘हिरवळ’ ही एकांकिका भाईंदर येथील शंकर नारायण महाविद्यालयाने सादर केली.

उल्हासनगर येथील सीएचएम महाविद्यालयाने विद्यार्थी निवडणुकांवर भाष्य करणारी ‘वि द स्टुडन्ट ऑफ इंडिया’ ही एकांकिका सादर केली. ज्ञानसाधना विद्यानिकेतन शाळेत पार पडलेल्या ठाणे विभागीय प्राथमिक फेरीचे परीक्षण सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक गणेश पंडित आणि लेखक निळकंठ कदम यांनी केले. या वेळी ‘आयरिस प्रॉडक्शन’च्या सुवर्णा रसिक राणे यादेखील उपस्थित होत्या.

विभागीय अंतिम फेरी गुरुवारी

‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी गुरुवार, १२ डिसेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणार असून या कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका गडकरी रंगायतन येथे कार्यक्रम सुरू होण्याच्या वीस मिनिटे आधी उपलब्ध होतील.

ही स्पर्धा युवकांना सद्य:स्थितीवर विचार करायला भाग पाडते. लोकांकिकामध्ये परीक्षक म्हणून काम करण्याचा एक वेगळाच अनुभव मिळाला.

– गणेश पंडित, परीक्षक

अतिशय उत्तम आयोजनामुळे लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेला तरुणांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतो. यंदा पार पडलेल्या एकांकिका विविध विषयांवर निगडित होत्या.

– निळकंठ कदम, परीक्षक

पूर्वी ठाणे विभागीय प्राथमिक फेरी ही एका दिवसात पार पडायची; आता मात्र  या स्पर्धेला तरुणांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

– सुवर्णा रसिक राणे, परीक्षक

दरवर्षी या स्पर्धेतून नवनवीन गोष्टी शिकण्यास आणि अनुभवण्यास मिळतात. ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी जोरदार तयार करू.

– निकिता घाग, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे

‘लोकसत्ता लोकांकिका’ ही मानाची स्पर्धा आहे. आपली कला सादर करण्यासाठी हे खूप मोठे व्यासपीठ आहे.

– गौरव सरफरे, कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय, उरण

या स्पर्धेत एकांकिका सादर करण्याचे पहिलेच वर्ष होते. खूप शिकायला मिळाले.

– करिश्मा संकपाळ, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी.