आशुतोष डुंबरे यांचे आवाहन; विद्यार्थी-पालकांच्या उत्साहात ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’चे पहिले पुष्प
करिअरच्या वाटा निवडताना त्यामागच्या प्रेरणा व्यापक स्वरूपाच्या हव्यात. आपण निवडलेल्या क्षेत्रामधून आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे, हे विद्यार्थ्यांनी आधीच ठरवले पाहिजे. करिअरच्या अनेक वाटा असल्या तरी भारतीय प्रशासकीय सेवा ही एक करिअरची सुवर्णसंधी आहे. देशाच्या प्रगतीचा भाग होण्यासाठी या वेगळ्या प्रवाहाचा शोध घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यायला हवे. क्षेत्र कोणतेही निवडले तरी सर्वोत्तम शिखरावर पोहचण्याचे लक्ष ठेवा, असे आग्रही प्रतिपादन ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी बुधवारी ठाण्यात केले. ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर उपस्थित होते.
दहावी-बारावीनंतर करिअरच्या वाटा निवडताना विद्यार्थी आणि पालकांमध्ये होणारी संभ्रमावस्था दूर व्हावी आणि यशाचा मार्ग, दिशा मिळावी या उद्देशाने ‘लोकसत्ता’च्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाच्या ठाण्यातील परिसंवादाची सुरुवात बुधवारी तीन हात नाका येथील टिपटॉप प्लाझाच्या सभागृहात झाली. अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी’ने प्रेझेंट केलेल्या व ‘विद्यालंकार क्लासेस’च्या सहकार्याने होत असलेल्या आणि सपोर्टेड बाय ‘युक्ती’ तसेच पॉवर्ड बाय ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन’, ‘अरेना अ‍ॅनिमेशन’, ‘पारूल युनिव्हर्सिटी’, ‘गणपत युनिव्हर्सिटी’, ‘रोबोमेट’, ‘एलटीए’, आणि ‘स्मास्मिरा’ आदींच्या विद्यमाने होत असलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’चे नॉलेज पार्टनर ‘आयटीएम’ हे आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या व्याख्यानातून झाली. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवा क्षेत्राची माहिती दिली.
प्रत्येकाची आवड, निवड आणि व्यक्तिमत्त्व वेगळे असले तरी स्पर्धेच्या परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी एकदम बदलून जातात. स्पर्धात्मक परिस्थिती तरुणांना गुंतवून ठेवते आणि माणसाच्या मनोवृत्तीमध्ये कमालीचे बदल होतात. त्यामुळे प्रत्येकाने या स्पर्धेला कसे तोंड द्यायचे याचा निर्णय घेणे आवश्यक आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ राजेंद्र बर्वे म्हणाले.

समुपदेशक म्हणतात..
* नीट परीक्षेसाठी राज्य मंडळाने पाठय़पुस्तक तयार केले असून त्याचा अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल.
-प्रा. अनिल देशमुख</strong>

* परीक्षेत गुण कमी मिळाले म्हणून कला शाखेची निवड करणे ही मानसिकता बदला. दुसरा पर्याय नाही आणि गणिताशी पटत नाही म्हणून कला शाखेत प्रवेश घेणे चुकीचे आहे.
-दीपाली दिवेकर

* आकडेमोडीची क्षमता, अंकासोबत खेळणे, जमा-खर्चाच्या नोंदी, व्यावहारिक ज्ञान, निर्णयक्षमता, अचूकतेने व गतीने काम करणे तसेच सांख्यिकी माहितीचे अर्थ -चंद्रकांत मुंडे,

* उद्योग व्यवसायाला जर कलेची साथ दिली तर नक्कीच तो यश संपादन करू शकेल. ललित कला क्षेत्रात येण्यासाठी स्वतची क्षमता ओळखा, पर्यायी अर्थार्जनाची तरतूद, अनुभवी व्यक्तींचा सल्ला, सतत नवीन काही तरी करण्याची वृत्ती, यशापयशात संतुलन राखणे तसेच आशावादी दृष्टिकोन बाळगला पाहिजे.
-जयवंत कुलकर्णी

* विज्ञान शाखा निवडताना विद्यार्थी कोणत्या विषयांची निवड करतात, यावर त्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे ज्या विषयात आवड असेल, त्याच विषयात उत्तम गुण मिळविता येतील. अशा विषयांची निवड करा.- श्रीकांत शिनगारे