News Flash

आज ठाण्यात ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मार्गदर्शन

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मार्गदर्शन

दहावी, बारावी या महत्त्वाच्या करिअर टप्प्यांवर नेमकी कोणत्या मार्गाची निवड करावी, याबद्दल विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात फार गोंधळ असतो. पण या निर्णयामध्ये तुम्हाला साथ देण्यासाठी आहे, ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा उपक्रम. आज, शनिवार आणि रविवारी ठाण्यात होणाऱ्या या करिअरविषयक कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना निरनिराळे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी कोणतेही मूल्य आकारण्यात येणार नाही. या कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये अपेक्षित गुण मिळवण्याचा प्रयत्न सारेच विद्यार्थी करत असतात. फक्त गुण मिळवणेच नव्हे तर त्यानंतर योग्य तो मार्ग निवडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु, सध्या करिअरचे इतके पर्याय उपलब्ध झाले आहेत की, विद्यार्थी आणि पालकांच्या मनात त्याविषयी संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा उपक्रम ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे आज, शनिवारी आणि उद्या रविवारी, २० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या नीट या प्रवेश परीक्षेविषयी अधिक माहिती, अभ्यासादरम्यानचा ताणतणाव, त्यात येणाऱ्या अडचणी, नव्या वाटा, परदेशी शिक्षणाच्या संधी आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बंधनकारक असलेल्या ‘नीट’ या प्रवेश परीक्षेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका असतात. म्हणूनच त्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी साठय़े कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रा. किशोर चव्हाण या कार्यशाळेत दोन्ही दिवस मार्गदर्शन करणार आहेत. ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनाही उत्तरे देतील. पहिल्या दिवशी डॉ राजेंद्र बर्वे विद्यार्थ्यांना स्पर्धेशी कसे जमवून घ्यावे याचा कानमंत्र देतील. तर करिअरचे यशस्वी पर्याय आणि शिक्षणाच्या वेगळ्या वाटा या विषयी करिअर समुपदेशक विवेक वेलणकर दोन्ही दिवस विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

उद्या म्हणजे रविवारी, २० नोव्हेंबरला डॉ. आनंद नाडकर्णी आपल्या मार्गदर्शनातून यशाची व्याख्या समजावून देतील. दोन्ही दिवशी परदेशातील शिक्षणसंधीविषयी करिअर समुपदेशक प्रथमेश आडविलकर मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेत दोन्ही दिवस समान विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. परंतु तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासोबतच विद्यार्थ्यांच्या शंकानिरसनालाही वेळ दिला जाणार आहे.

  • वेळ – स. ९.३० ते ४.३०
  • कुठे – टिपटॉप प्लाझा, तीन हात नाका, ठाणे
  • प्रवेश – प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

प्रायोजक

या उपक्रमाचे ‘टायटल पार्टनर’ पितांबरी तर असोसिएट पार्टनर विद्यालंकार क्लासेस असतील; तर पॉवर्ड बाय पार्टनर्स अलिफ ओव्हरसीज, सक्सेस फोरम, रोबोमेट प्लस, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट, आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन, विद्यासागर क्लासेस आणि चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटन्ट्स, दिलकॅप कॉलेजेस अ‍ॅण्ड इन्स्टिटय़ूट्स, नेरळ हे आहेत. हॉटेल टिप टॉप प्लाझा हे व्हेन्यू पार्टनर असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 1:48 am

Web Title: loksatta marg yashacha 18
Next Stories
1 पार्किंगच्या नावाखाली लूट
2 धर्मवीरांच्या उद्यानात कचऱ्याचा ढीग
3 ठाण्यात प्रत्येक डॉक्टरची नोंदणी होणार
Just Now!
X