News Flash

स्पर्धा परीक्षा उमेदवार निवडीची पद्धत आदर्श!

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांचे मत

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यक्रमात ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांचे मत

‘केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगा यांच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड केली जाते. या परीक्षेची उमेदवार निवडीची पद्धत आदर्शवत आहे. दहावी, बारावी आणि पदवीपर्यंतचे शिक्षण वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयांत घेतलेल्या विद्यार्थ्यांची एकाच पातळीवर बौद्धिक चाचणी घेऊन त्यांची गुणवत्ता तपासणे या प्रक्रियेमुळे शक्य होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षा आणि सीईटीचा मी समर्थक असून सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेचा लाभ होतो’, असे मत ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले. शनिवारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ठाण्याच्या टिपटॉप प्लाझामध्ये आयोजित परिसंवादाला ठाणे शहर व आसपासच्या इतर शहरांतील विद्यार्थी आणि पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

दहावी, बारावी या महत्त्वाच्या करिअर टप्प्यांवर नेमकी कोणत्या मार्गाची निवड करावी याबद्दल विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारच्या सत्रांमध्ये करिअर समुपदेशक प्रा. किशोर चव्हाण, प्रथमेश आडविलकर, विवेक वेलणकर, राजेंद्र बर्वे यांनी मार्गदर्शन केले. उद्घाटनाप्रसंगी सुनील चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेची ओळख करून दिली. राज्यात ३५० आयएएस अधिकारी कार्यरत असून यूपीएससीमार्फत त्यापैकी २५० अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊन त्यातील काही पदोन्नतीने तर १५ जण निवड प्रक्रियेतून अधिकारी होत असतात, असे चव्हाण म्हणाले. विद्यालंकार क्लासेसच्या मार्केटिंग मॅनेजर जयश्री खंडेलवाल, विद्यासागर क्लासेसचे प्रोग्राम डायरेक्टर रवींद्र नाडकर्णी, अलिफ ओव्हरसीजचे इंटरनॅशनल एज्युकेशन स्पेशालिस्ट रवींद्र देवकर, सक्सेस फोरमचे सेंट्रल मॅनेजर प्रदीप मंडल यांनी या वेळी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना दहावीपर्यंतचा अभ्यास करताना पाठांतर करण्याची सवय असते. मात्र ‘नीट’चा अभ्यास करताना पाठांतरापेक्षा संकल्पना समजून घेऊन अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. ‘नीट’चा  अभ्यास करताना ज्ञान, आकलन, कृती आणि तंत्र या पायऱ्यांचा विद्यार्थ्यांनी विचार करावा. अभ्यास करताना एखाद्या संकल्पनेमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. प्रवेश परीक्षेदरम्यान होणारा गैरव्यवहार टाळण्यासाठी नीट ही एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – प्रा. किशोर चव्हाण,  साठय़े महाविद्यालय

कला आणि वाणिज्य शाखेकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन अत्यंत पक्षपाती असून मुलांनी याकडे वळूच नये असाच पालकांचा कल असतो. मात्र कला आणि वाणिज्य शाखेतून करिअरच्या नव्या संधी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. सध्याचे पालक जरी विद्यार्थ्यांवर दबाव आणत नसले तरी मित्रमंडळींचा दबावही आपल्याला भरकटवत असतो. त्यामुळे दहावीच्या परीक्षेनंतर आपल्याला आवडलेले विषय निवडा आणि त्या दिशेने पुढील शिक्षण करा.  – विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक

देशातून साडेतीन लाख मुले परदेशामध्ये शिक्षणासाठी जात असून या मुलांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाच्या उत्तम संधी तेथे मिळतात. योग्य नियोजन आणि पूर्वतयारी केल्यास परदेशी शिक्षणाचा मार्ग सोपा आणि काहीसा स्वस्तही होऊ शकतो. तेथील शैक्षणिक गुणवत्ता, नोकरीच्या संधी, तज्ज्ञ मार्गदर्शक, अभ्यासास पूरक वातावरण आणि शिष्यवृत्तीच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये मोठी भर पडते. या सकारात्मक गोष्टी विचारात घेतल्यास परदेशी शिक्षण ही विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची चांगली संधी आहे. – प्रथमेश आडविलकर, करिअर समुपदेशक

करिअरच्या दिशेने वाटचाल करताना नकळतपणे आपण स्पर्धा करत असतो. मात्र स्पर्धा करताना स्वत:च्या आवडीचा आपल्याला विसर पडतो. स्वत:च्या सादरीकरणापेक्षा इतरांच्या सादरीकरणाशी आपण तुलना करतो. असे झाल्यास स्वत्वाचा विसर पडून आपण इतरांनी निवडलेल्या प्रवाहात वाहत जातो. विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करताना आपल्याला काय वेगळे करायचे आहे याचा विचार करावा. करिअरमध्ये व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असावे. – डॉ. राजेंद्र बर्वे, मानसोपचारतज्ज्ञ

प्रायोजक :  या उपक्रमाचे ‘टायटल पार्टनर’ पितांबरी तर असोसिएट पार्टनर विद्यालंकार क्लासेस असतील; तर पॉवर्ड बाय पार्टनर्स अलिफ ओव्हरसीज, सक्सेस फोरम, रोबोमेट प्लस, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट, आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन, विद्यासागर क्लासेस आणि चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटन्ट्स, दिलकॅप कॉलेजेस अ‍ॅण्ड इन्स्टिटय़ूट्स, नेरळ हे आहेत. हॉटेल टिप टॉप प्लाझा हे व्हेन्यू पार्टनर असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2016 1:53 am

Web Title: loksatta marg yashacha 19
Next Stories
1 आदिवासींची उपासमार!
2 ‘अमृत आहार’ला अन्नसुरक्षा कायद्याचे कवच
3 निवडणुकीपूर्वी राजकारण्यांची कोंडी
Just Now!
X