News Flash

करिअरच्या विविध वाटा उलगडल्या!

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यक्रमाला दुसऱ्या दिवशीही भरघोस प्रतिसाद

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या उपक्रमात करिअरविषयक शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती. (छाया : दीपक जोशी)

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यक्रमाला दुसऱ्या दिवशीही भरघोस प्रतिसाद

दहावी, बारावी परीक्षेच्या निकालानंतर करिअरचा मार्ग निवडताना नीट, सीईटी, स्पर्धा परीक्षांसह करिअरचे अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहेत. आजूबाजूच्या वातावरणामुळे शिक्षणाच्या कोणत्या दिशेला आपल्याला जायचे आहे, याचे भानही विद्यार्थ्यांना राहात नाही. अशा वेळी विद्यार्थी आपल्या क्षमता आणि त्रुटींचा विचार करून निर्णय घेण्याऐवजी बाह्य़ आकर्षणातून करिअरची दिशा ठरवण्याची शक्यता असते. या काळात विद्यार्थी आणि पालकांसमोर निर्माण होणारा गुंता आणि करिअरविषयक शंका कठीण होत असतात. या सर्वाचे निरसन सोप्या आणि रंजक पद्धतीने ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या उपक्रमातून रविवारी झाले आणि करिअरच्या वाटा उलगडल्या. ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाच्या सभागृहात मोठय़ा संख्येने उपस्थित विद्यार्थी आणि पालकांनी या उपक्रमाला मनसोक्त दाद दिली.

ठाण्यातील तीनहात नाका परिसरात असलेल्या टिपटॉप प्लाझाच्या सभागृहामध्ये आयोजित ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ उपक्रमाला विद्यार्थी आणि पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रामध्ये मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

आयुष्यात ताणतणाव असला तरी त्याचा अतिरेक असता कामा नये. ताणतणावातून आयुष्य घडू आणि बिघडूही शकते. त्यामुळे त्याचे प्रमाण अन्नातील मिठाप्रमाणे प्रमाणामध्ये असायला हवे, तर विवेक वेलणकर यांनी विज्ञान शाखेबरोबरच कला आणि वाणिज्य शाखेतील विविध करिअरच्या वाटा उलगडून दाखवल्या.

परदेशी शिक्षणातील संधी आणि पूर्वतयारी यांचे महत्त्व प्रथमेश आडविलकर यांनी समजावून सांगितले, तर अखेरच्या सत्रामध्ये प्रा. किशोर चव्हाण यांनी नीट परीक्षेची परिपूर्ण माहिती दिली.

रोबोमेट प्लसचे कमलेश गावडे, विद्यालंकार क्लासेसचे हितेश मोघे, विद्यासागर क्लासेसचे प्रा. सलिम अख्तर आणि कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूटच्या सोनल साटेलकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दहावी आणि बारावी संपल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर यापुढे कोणती शाखा निवडावी, हा प्रश्न उभा राहत असतो. त्या वेळी पालक, शेजारी आणि मित्रांचा विद्यार्थ्यांवर दबाव येतो आणि कोणत्या तरी आवड नसलेल्या शाखेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. आपले आयुष्य घडवणारी  शाखा निवडण्याचा अधिकार आपल्याला असून इतरांना तो अधिकार देऊ नका.

– विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक

ताण-तणाव हे आयुष्यात अन्नपदार्थातील मीठाप्रमाणे असावे. पदार्थात अतिरिक्त मीठ पडले तर पदार्थ खारट होतो आणि कमी पडले तर पदार्थ अळणी होतो. अगदी त्याचप्रमाणे ताणतणावाचा अतिरेक झाला तर त्याचे वाईट परिणाम होतात आणि आयुष्यात बिनधास्त राहिलो तरी जे साध्य करायचे आहे त्यात अडथळा येतात. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा सुवर्णमध्य साधणे गरजेचे आहे. मानवामध्ये स्वत:च्या अनुभवाकडे पुन:पुन्हा पाहण्याची शक्ती असेल तर मनुष्य अधिकाधिक शिकत जातो. ताणतणावाचा अतिरिक्त बोज घेतल्याने आपल्या अपयशाला आपणच कारणीभूत ठरतो.  त्यामुळे शांतपणे विचार करूनच निर्णय घ्यावा.

– डॉ. आनंद नाडकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ

परीक्षा कधीच कठीण नसतात तर आपण ज्या दृष्टिकोनातून परीक्षांकडे बघतो त्यानुसार परीक्षा आपल्यासाठी कठीण किंवा सोप्या ठरत असतात. प्रत्येक महाविद्यालयाची सीईटी देण्याचे मुलांचे कष्ट  वाचवण्याच्या दृष्टीने ‘नीट’ या प्रवेश परीक्षेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे वेळ, पैसा आणि अनावश्यक श्रमही यामुळे वाचतात. बारावीच्या परीक्षेनंतर नीट परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून तयारी केल्यास ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग खुला होऊ शकतो. एमबीबीएस आणि बीडीएससाठी एकमेव प्रवेश परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येतो.

– प्रा. किशोर चव्हाण,साठय़े महाविद्यालय

परदेशातील विद्यापीठे आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यामध्ये संलग्नता असल्यामुळे तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि अनुभव अशा दोन्ही गोष्टींचा लाभ होत असतो. विद्यापीठांना आवश्यक निधीची उपलब्धता उद्योगांकडून केली जाते तर उद्योगांना आवश्यक पेटंट विद्यापीठांकडून संशोधित करून दिले जातात. त्यामुळे परदेशी

विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकत असताना आवश्यक पैसेही उपलब्ध करता येतात. त्यामुळे शिक्षणासाठीच्या पैशांचे दडपण विद्यार्थ्यांवरून कमी होऊन त्यांना संशोधनाकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.  – प्रथमेश आडविलकर, करिअर समुपदेशक

प्रायोजक :  या उपक्रमाचे ‘टायटल पार्टनर’ पितांबरी तर असोसिएट पार्टनर विद्यालंकार क्लासेस असतील; तर पॉवर्ड बाय पार्टनर्स अलिफ ओव्हरसीज, सक्सेस फोरम, रोबोमेट प्लस, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट, आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन, विद्यासागर क्लासेस आणि चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटन्ट्स, दिलकॅप कॉलेजेस अ‍ॅण्ड इन्स्टिटय़ूट्स, नेरळ हे आहेत. हॉटेल टिप टॉप प्लाझा हे व्हेन्यू पार्टनर असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2016 1:46 am

Web Title: loksatta marg yashacha 20
Next Stories
1 स्पर्धा परीक्षा उमेदवार निवडीची पद्धत आदर्श!
2 आदिवासींची उपासमार!
3 ‘अमृत आहार’ला अन्नसुरक्षा कायद्याचे कवच
Just Now!
X