‘मार्ग यशाचा’ कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची आज आणखी संधी

बारावी, दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर असलेल्या करिअरच्या पर्यायांचा शोध घेण्यासाठी शुक्रवारी टीप टॉप प्लाझा येथे आयोजित केलेला आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तुडुंब गर्दी केली होती. वयाच्या विशिष्ट टप्प्यावर करियरचा मूलमंत्र जाणून घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली. प्रशासकीय सेवा, अभिनय, चित्रकला, हॉटेल व्यवस्थापन या करिअरच्या वेगळ्या वाटांविषयी तज्ज्ञांकडून माहिती घेतानाच करिअर घडवणाऱ्या मार्गात येणाऱ्या ताण व्यवस्थापनाचे सूत्र विद्यार्थ्यांना उलगडता आले.

ठाण्याचे सायबर आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. करिअर निवडताना मनात येणारे संभ्रमाचे अडथळे दूर करण्याचे तंत्र त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवले. आपल्या आवडीनुसार करिअर निवडणे अथवा निवडलेले काम आवडीने करणे याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

करिअरच्या वेगळ्या वाटा या सत्रात हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रातील शेफ देवव्रत जातेगावकर, अभिनेते अभय कुलकर्णी आणि कलाशाखेविषयी महेंद्र दामले यांनी या वेगवेगळ्या क्षेत्रातील करिअरच्या संधी, प्रवेश प्रक्रिया याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कला शाखेचे क्षेत्र असले तरी कोणत्याही क्षेत्रात शिक्षणाला पर्याय नसतो. या क्षेत्रात करिअर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आपल्या आवडीनुसार शिक्षण घेणे महत्त्वाचे असते, असा मोलाचा सल्ला या चर्चासत्रात विद्यार्थ्यांना देण्यात आला. करियरच्या वेगळ्या वाटा निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन या चर्चासत्राद्वारे मिळाले. अभ्यासातील अपयश पचवण्याचे सूत्र माईंड गुरू डॉ. राजेंद्र बर्वे यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडले. बौद्धिक खेळाच्या माध्यमातून ताणमुक्तीचा मार्ग बर्वे यांनी विद्यार्थ्यांना सांगितला.

नुकत्याच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५४ वा क्रमांक पटकावलेले दिग्विजय बोडके यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लागणारे विशेष तंत्र विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच मेडिकल आणि अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाविषयी डॉ. विजय सुरासे, डॉ. जयंत पानसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नीट परीक्षा, अभियांत्रिकी डिप्लोमा, पदवी यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेश परीक्षा याविषयी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांबरोबर सविस्तर चर्चा केली. करिअरविषयक मिळालेला मूलमंत्र जाणतानाच सभागृहाबाहेर विविध अभ्यासक्रमांविषयी प्रात्यक्षिक माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी-पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला होता.

लोकसत्ता मार्ग यशाचा या कार्यक्रमामुळे करियरचा मार्ग निवडण्यास मदत झाली. प्रत्येक वक्त्यांनी करियर करताना कष्ट करणे किती गरजेचे आहे या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. अभ्यासाची पद्धत, प्रवेश परीक्षा पास करण्याचे तंत्र समजावून सांगितले. त्यामुळे करियर निवडताना त्रास होणार नाही. -ऋचा प्रधान, ठाणे</strong>

मार्ग यशाचा या कार्यक्रमामुळे करियरच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली आहे. डॉ. राजेंद्र बर्वे यांनी सांगितलेले ताणमुक्तीचे तंत्र नेहमीच लक्षात राहील. त्याचबरोबर करियरच्या  वाटा कशा निवडाव्या याबद्दलदेखील मोलाचे मार्गदर्शन मिळाले.  -ओम नांदीसकर, ठाणे

प्रायोजक

  • टायटल पार्टनर – आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स
  • असोसिएट पार्टनर – विद्यालंकार क्लासेस, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, संदीप युनिव्हर्सिटी
  • पॉवर्ड बाय पार्टनर – के ११ अ‍ॅकॅडमी ऑफ फिटनेस सायन्स, उत्क्रांती राइज अ‍ॅण्ड राइज, युक्ती इंजिनीअरिंग, मेडिकल अ‍ॅण्ड फाऊंडेशन, सासमिरा लिंक टू द मिनिस्टरी ऑफ टेक्सटाईल्स, भारत सरकार, रॉय ओव्हरसिज, पाथवे ग्रुप, ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नोलॉजी, पृथ्वी अ‍ॅकेडमी फॉर यूपीएससी अ‍ॅण्ड एमपीएससी, इंदिरा गांधी इंजिनीअरिंग कॉलेज, भारत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट, करिअर व्हिजन, एव्हिएशन अ‍ॅकेडमी.