बारावी, दहावी परीक्षांनंतर करिअरच्या पर्यायांचा शोध घेण्यासाठी बुधवारी टिपटॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालकांनी तुडुंब गर्दी केली होती. या करिअर कार्यशाळेचे उद्घाटन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाच, शिवाय पालकांनाही मार्गदर्शन केले. वयाच्या विशिष्ट टप्प्यावर करिअरचा मूलमंत्र जाणून घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना यानिमित्ताने उपलब्ध झाली.

वैद्यकशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, कायदा, प्रशासकीय सेवा यासोबतच माध्यम आणि डिजिटल क्षेत्रातील करिअर वेगवेगळ्या वाटांविषयी तज्ज्ञांकडून माहिती घेतानाच करिअर घडवणाऱ्या मार्गात ताण व्यवस्थापनाचे सूत्र विद्यार्थ्यांना उलगडता आले. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी प्रशासकीय सेवेतील संधी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठीचा मूलमंत्र याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कुठलेही काम किंवा क्षेत्र छोटे नाही. विद्यार्थी त्याचे करिअर निवडत असताना पालकांनी विद्यार्थ्यांवर दबाव आणू नये. एखाद्या विद्यार्थ्यांला समाजाविषयी आपुलकी असेल आणि त्याला असे वाटत असेल की आपण समाजाचे देणे लागतो तर अशा विद्यार्थ्यांने जरूर प्रशासकीय सेवेत यायला हवे, असे फणसाळकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.  शासकीय नोकरी ही सेवा म्हणून पाहावी, असे सांगून यावेळी त्यांनी सार्वजनिक प्रशासकीय सेवेतील संधीविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी ‘करिअर निवडीतील ताण’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पालकांचा विद्यार्थ्यांसोबत सुयोग्य संवाद असावा. करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण घेऊ नये, असे डॉ. हरीश शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रात विविध उपशाखा आहेत. वैद्यकीय करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी या उपशाखांचा विचार करायला हवा, असे डॉ. सागर मुंदडा यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. वैद्यकीय क्षेत्रातील करिअरविषयी डॉ. सागर मुंदडा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कायद्याचे शिक्षण घेताना फक्त चार भिंतीच्या आतील शिक्षणापुरतेच मर्यादित राहू नये तर न्यायालय तसेच इतर कायद्याच्या फर्ममध्येही सराव करायला हवा, असे प्रा. नारायण राज्याध्यक्ष यांनी सांगितले. प्रा. नारायण राजाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना विधी शिक्षणाविषयी तसेच विधिमधील करिअर संधीविषयी माहिती दिली.

ठाण्यात भाडिपाचे जास्त चाहते आहेत, भाडिपा हा मराठीतील पहिला डिजिटल कॉन्टेन्टमधला मोठा बदल आहे. आम्ही सुरुवातीला भाडिपा हे डिजिटल कॉन्टेन्ट माध्यम ‘कॅज्युएली’ सुरू केले आणि आज त्याचे जगभरात चाहते आहेत. डिजिटल कॉन्टेन्टरमध्ये खूप चांगले पण मेहनत करावे लागणारे करिअर आहे, असे सारंग साठय़े याने सांगितले. वेबविश्वातील करिअरविषयी भारतीय डिजिटल पार्टी अर्थात भाडिपाचे सारंग साठय़े यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लेखनामध्ये करिअर आहे, मात्र अनेकांमध्ये याविषयी जागृती नाही. आपल्याला जे आवडते ते नक्की मनापासून लिहावे, असे सचिन दरेकर यांनी सांगितले. लेखनातील करिअर विषयावर सचिन दरेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. काळानुसार पत्रकारिता बदलत आहे. खूप चांगले करिअर माध्यम क्षेत्रात तयार होऊ लागले आहे. या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर मेहनत आणि अभ्यासाची जरूर तयारी ठेवावी, असे ज्ञानदा कदम यांनी सांगितले. टेलिव्हिजनवरील पत्रकारिता या विषयावर ज्ञानदा कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी ‘करिअर निवडीच्या टप्प्यावर’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निरसन कार्यशाळेतील सर्व तज्ज्ञांनी केले. करिअरविषयक मिळालेला मूलमंत्र जाणतानाच सभागृहाबाहेर विविध अभ्यासक्रमांविषयी प्रात्यक्षिक माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.

सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया-

तज्ज्ञ व्यक्तींचे परिपूर्ण मार्गदर्शन

दोन वर्षांपूर्वी शालेय शिक्षण घेत असताना मी ‘लोकसत्ता’च्या ‘मार्ग यशाच्या’ कार्यशाळेत सहभागी झालो होतो. त्यानंतर आज माझी बारावी पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा या कार्यशाळेत सहभागी झालो आहे. मार्ग यशाचा या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील संधींविषयी माहिती मिळते. कार्यशाळेत सहभागी झालेल्या तज्ज्ञ व्यक्तींनी परिपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटक पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे प्रशासकीय सेवेतील संधींविषयीचे मार्गदर्शन मला आवडले.

-वरुण शेठ, घाटकोपर

करिअरचे तंत्र समजले

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअरच्या कार्यशाळेत दहावी आणि बारावीनंतरच्या करिअरच्या संधी याबद्दल परिपूर्ण माहिती मिळाली. मानसोपचाराविषयी डॉ. हरीश शेट्टी यांनी सांगितले. ताणतणावाचा सामना कसा करायचा हे मार्गदर्शन जास्त आवडले. सध्या अकरावीत असून जाहिरात क्षेत्रात पुढे करिअर करायचे आहे. या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील संधी आणि स्पर्धा परीक्षा या विषयी माहिती मिळाली.

-साक्षी अहिरा, ठाणे</p>

तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची आज आणखी संधी

मानसोपचार तज्ज्ञ डॉ.हरीश शेट्टी ‘करीअर निवडीतील ताण’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद आज संवाद साधणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील करिअरविषयी डॉ. अमोल अन्नदाते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. प्रा. नारायण राजाध्यक्ष विधि शिक्षणातील संधीविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. समाजमाध्यमांवर इन्फ्लुएन्सर असणाऱ्या ब्लॉगर प्रिया आडिवरेकर तसेच लेखनातील करिअर विषयावर सचिन दरेकर हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत, तर टेलिव्हिजनवरील पत्रकारिता या विषयावर ज्ञानदा कदम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. करिअर समुपदेशक विवेक वेलणकर ‘करिअर निवडीच्या टप्प्यावर’ या विषयावर विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहेत.

प्रायोजक

या कार्यशाळेचे टायटल स्पॉन्सर ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ असून सहप्रायोजक ‘ विद्यालंकार क्लासेस’ आहेत. एनएमआयएमएस स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी, एज्युकेशन ओव्हरसीज, सासमिरा, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, युक्ती, द रिलायबल अकॅडमी आणि सिम्बॉयसिस स्किल अँड ओपन युनिव्हर्सिटी हे पॉवर्डबाय पार्टनर्स असून स्टेट बँक ऑफ इंडिया बँकिंग पार्टनर आहेत.

कधी?

गुरुवार, ६ जून (आज) सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत.

कुठे?

हॉटेल टिपटॉप प्लाझा, एलबीएस मार्ग, मुलुंड चेकनाक्याजवळ, ठाणे (प.)