नवभक्ती, नवरंग आणि नवरात्री असा तिहेरी संगम असलेल्या ‘लोकसत्ता ९९९’ या अनोख्या स्पर्धेचा पाचवा सोहळा डोंबिवलीच्या एकता नगर भागातील एकता मित्र सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात रविवारी रात्री पार पडला. झाडे लावा, मुलगी वाचवा, प्लास्टिकचा वापर टाळा, पाणी वाचवा अशा विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा मंगळागौर हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. उखाणे आणि पारंपरिक खेळांच्या स्पर्धेबरोबर नृत्य, पाककला, प्रश्नमंजूषा यांसारख्या विविध स्पर्धानी सोहळ्यात रंगत आणली. आबालवृद्धांच्या सहभागामुळे उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्यात आनंद, उत्साह आणि नवरंगांची बरसात झाली.

नवरात्रोत्सव केवळ गरब्यापुरता मर्यादित न ठेवता आपल्या मराठमोळ्या संस्कृतीशी तिचा मिलाप घडवून आणण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘नवभक्ती, नवशक्ती आणि नवरंग ९९९’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. रामबंधु चिवडा मसाला प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९’ अंतर्गत या उपक्रमाच्या डोंबिवली येथील कार्यक्रमास अभिनेत्री ऋजुता देशमुख ही खास उपस्थित होती. स्मिता गवाणकर आणि कुणाल रेगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रश्नमंजूषा कार्यक्रमाने सोहळ्याला सुरुवात झाली. स्ट्रॉपासून फुगे फुगवून लॉलीपॉप बनवणे, स्ट्रॉच्या माळा बनवणे, बाटल्यांमध्ये पाणी भरणे असे रंजक खेळही खेळण्यात आले. या खेळातील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

मंडळातील स्थानिक जोडप्यांसोबत हार, कंबरपट्टा, पैंजण असा गमतीशीर खेळ खेळण्यात आला. खेळात बाद होणाऱ्या जोडप्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. काही जोडप्यांनी एकापेक्षा एक उखाणे घेतले. मंडळातील हौशी महिलांचे नृत्याविष्कार या वेळी सादर झाले. सामूहिक नृत्यही या वेळी सादर करण्यात आले. लावणी, जोगवा आदी विविध नृत्यांमध्ये प्रेक्षक दंग झाले. ‘श्री व सौ’च्या स्पर्धेत जिंकलेल्या जोडीला ‘एम. के घारे ज्वेलर्स’चा एक लखलखता हार ‘लोकसत्ता’चे धर्मेश म्हस्कर यांच्या हस्ते देण्यात आला. ‘दिवाळी फराळ’ या पाककला स्पर्धेत तरुणींपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्व जणी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत मनश्री विरकर, किरण शाह, जयश्री अहिवळे, वैशाली दोशी, संपदा शिंदे, प्रीती साळवी या विजेत्यांना ‘राम बंधु मसाले’ यांच्यातर्फे पारितोषिके देण्यात आली. स्पर्धकांनी पापड चिवडा, मेथी मठरी, ओट्स चिवडा, नाचणी चकली यांसारखे चमचमीत पदार्थ तयार केले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वसामान्य महिलांच्या हातात असणाऱ्या अन्नपूर्णेचा वास अनुभवण्याची संधी मिळते, तसेच चमचमीत पदार्थ चाखता येतात, असे मत अभिनेत्री आणि परीक्षक ऋजुता देशमुख हिने व्यक्त केले. एकता नगर, डोंबिवलीच्या नगरसेविका ज्योती मराठे आणि माजी नगरसेवक राजन मराठे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

नवरात्रोत्सवाच्या या कार्यक्रमाला ‘रामबंधु’चे मिच्छद्र कुंटे, स्वप्नाली शिंदे, ऐश्वर्या सप्रे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस डोंबिवलीतील ‘एकता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा’ला ‘लोकसत्ता’तर्फे ९ हजार ९९९ रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

‘लोकसत्ता ९९९’ हा कार्यक्रम आमच्या एकता मित्र मंडळात आयोजित करण्यात आला होता. आमच्या मंडळातील कार्यकर्त्यांचे कौतुक झाले, तसेच विभागातील महिलांना त्यांच्यातील कला-गुण दाखवण्याची संधी मिळाली. त्याबद्दल ‘लोकसत्ता’चे खूप खूप आभार. ‘श्री व सौ’ हा खेळ वेगळाच होता. परिसरातील नागरिकांनीही या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद लुटला. असेच प्रोत्साहनपर कार्यक्रम सातत्याने करत राहा.    – ज्योती मराठे, नगरसेविका, एकता मित्र मंडळ