राज्यातील तरुणाईला विचारप्रवृत्त करणाऱ्या आणि सभोवतालच्या घटनांवर व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ देणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या वक्तृत्व स्पर्धेच्या सहाव्या पर्वाला रत्नागिरी येथून उत्साहात सुरुवात झाली. आज या स्पर्धेची ठाणे विभागीय प्राथमिक फेरी रंगणार असून विभागीय प्राथमिक फेरीत ठाणे आणि उपनगरांतील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी वक्ते मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे यंदाही प्राथमिक फेरीपासूनच स्पर्धकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

सामाजिक जाणिवा जागृत होतील अशा वैविध्यपूर्ण आणि अभ्यासात्मक दृष्टिकोनातून विषयाचे सादरीकरण करण्याची तरुण वक्त्यांना संधी देणारी ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ ही स्पर्धा महाविद्यालयीन तरुणांमध्ये मानाची समजली जाणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून निर्भीडपणे विचार मांडणाऱ्या तरुण वक्त्यांची ओळख महाराष्ट्राला करून देण्यात येत असून, यंदा या स्पर्धेचे सहावे पर्व रंगणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरण, खेळ, सामाजिक आणि राजकीय अशा विविध विषयांवर परखडपणे व्यक्त होण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ही स्पर्धा तीन टप्प्यांत होणार आहे. प्राथमिक फे रीतून निवडण्यात आलेले वक्ते विभागीय अंतिम फे रीत दाखल होतील. विभागीय अंतिम फे रीतील विजेत्या वक्त्यांची महाअंतिम फे री मुंबईत रंगणार असून त्यातून या वर्षीचा राज्यातील ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ निवडण्यात येणार आहे.

प्राथमिक फेरीचे विषय

* ‘निर्भया आणि नंतर’

* ‘जंगलाच्या शोधात वाघोबा!’

* ‘स्वच्छ भारत : एक दिवास्वप्न’

* ‘ज्यांचे त्यांचे गांधी आणि सावरकर’

* ‘ऑलिम्पिक वर्षांत क्रिके टची चिंता’

मुंबईतून सहा वक्ते विभागीय अंतिम फेरीत

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेची मुंबई विभागीय प्राथमिक फेरी शनिवारी ‘लोकसत्ता’च्या मुंबई कार्यालयात पार पडली. विषयाचा अभ्यास, स्पष्ट विचार आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणी करत वक्त्यांनी परीक्षकांची मने जिंकली. अक्षय शारदा शरद, कनिका जाधव, वैष्णवी प्रभुदेसाई, तन्वी गुंडये, प्रतीक पवार, श्रेयस सनगरे या वक्त्यांनी विभागीय अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

‘निर्भया आणि नंतर..’, ‘जंगलाच्या शोधात वाघोबा!’, ‘स्वच्छ भारत : एक दिवास्वप्न’, ‘ज्यांचे त्यांचे गांधी आणि सावरकर’, ‘ऑलिम्पिक वर्षांत क्रिके टची चिंता’ असे प्राथमिक फेरीचे विषय होते. ‘स्वच्छ भारत’ मोहिमेविषयी बोलताना स्वच्छतेची जबाबदारी सरकारवर टाकून चालणार नाही. प्रत्येकाने स्वतपासून सुरुवात केली पाहिजे. स्वच्छता ही वैयक्तिकतेकडून सामूहिकतेकडे नेणारी जबाबदारी आहे, असे विचार वक्त्यांनी मांडले. त्याच वेळी त्यांनी स्वच्छता, कामगारांचा संघर्ष आणि जलस्रोतांची स्वच्छता या मुद्दय़ांकडेही लक्ष वेधले.

महात्मा गांधी यांनी दिलेला सत्य, अहिंसेचा मंत्र समजून घ्यायला हवा. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वास्तववादी विचारांचाही सखोल अभ्यास व्हायला हवा. या दोन्ही व्यक्तिमत्त्वांनी घेतलेली भूमिका परिस्थितीजन्य होती. त्यामुळे आपणही भूमिका घेताना वास्तवाचे भान ठेवायला हवे, असे वक्त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या शहरीकरणात जंगल हरवते आहे. त्यामुळे प्राणी मानवी वस्तीत शिरतात व आपला प्राण गमावतात. विकास आणि सजीव यांच्या समतोल साधायचा असेल तर नागरिकांमध्ये भान यायला हवे. वाघाने हल्ला केल्यावर घाबरून त्याला ठार न करता अशावेळी काय प्रतिक्रिया द्यावी याबाबत नागरिकांना प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. पूरस्थितीत प्राण्यांचा बुडून मृत्यू होतो. यासाठी जंगलात उंचवटय़ाची जागा निर्माण करणे, दुष्काळात प्राण्यांना टँकरने पाणी पुरवणे, इत्यादी उपाय वक्त्यांनी सुचवले.

निर्भया ही एक प्रतिमा आहे. तिला फक्त स्त्री संकल्पनेत बांधून चालणार नाही. समाजातील प्रत्येक भयभीत व्यक्ती निर्भया आहे. निर्भया म्हणजे प्रत्येक बलाढय़ शक्तीने वर्चस्वासाठी इतरांवर केलेले आक्रमण आहे. स्त्री सक्षमीकरणाविषयी भरपूर चर्चा होते. आता पुरुषांच्या सक्षमीकरणाची वेळ आली असल्याचे मत वक्त्यांनी मांडले. इंग्रजांविरुद्ध लढता येत नाही, मग क्रिकेटमध्ये तरी त्यांना हरवू या भावनेतून क्रिकेटला देशभक्तीची जोड मिळाली. मात्र यामुळे इतर खेळांकडे दुर्लक्ष झाले. वर्षभर कोणताच आर्थिक, भावनिक आधार न देता आपण खेळाडूंक डून ऑलिम्पिक पदकांची अपेक्षा ठेवतो. खेळाडूंना घडवणे ही सरकारप्रमाणेच समाजाचीही जबाबदारी असल्याची भावना वक्त्यांनी व्यक्त केली.

स्पर्धेचे परीक्षण प्रा. गीता मांजरेकर आणि प्रा. वर्षां मालवदे यांनी केले. ‘सर्व वक्त्यांनी खूप माहिती गोळा केली. पण आवश्यक ती भूमिका घेतली नाही. काहींचे विषय घरंगळले. त्यामुळे स्पर्धेत उतरण्याआधी तुमचे प्राध्यापक, तज्ज्ञ यांची मदत घ्या’, असा सल्ला प्रा. मांजरेकर यांनी दिला. ‘चारचौघांपेक्षा वेगळा विषय निवडण्याचा प्रयत्न करा. माहिती, संशोधन आणि मांडणी यातील फरक समजून घ्या. हातवारे करायची सवय कमी झाली पाहिजे. कोणत्या तरी आवडत्या वक्त्याच्या किंवा नेत्याच्या शैलीची नक्कल करू नका. स्वतची शैली स्वीकारा. प्रत्येक विषय कविता किंवा गाण्यांतून मांडता येत नाही. सुरुवातीलाच कवितेतून सगळी भूमिका उघड करण्यापेक्षा भाषण हळूहळू उलगडत जाऊ द्या’, असे मार्गदर्शन प्रा. मालवदे यांनी केले.

मुंबई विभागीय अंतिम फेरी

* कधी : ७ मार्च २०२०, सायं. ५.३० वाजता

* कुठे : दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माटुंगा

नाशिक विभागातून १० स्पर्धकांची निवड

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषु’ या स्पर्धेत नाशिक विभागीय प्राथमिक फेरीतून १० स्पर्धकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. ही फेरी सात मार्च रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे. शुभांगी थोरात ( के.पी.जी महाविद्यालय, इगतपुरी), शुभम भिल (चोपडा महाविद्यालय), आशुतोष बच्छाव (म.स.गा. महाविद्यालय, मालेगाव), हितेश सोनवणे (के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक), निकिता कातकाडे (एस. एस. के महाविद्यालय, वडझिरे, सिन्नर), वृषाली राणे (अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर), श्रृती बोरस्ते (जे. आर. सपट महाविद्यालय, नाशिक), मुग्धा थोरात (जे. आर. सपट महाविद्यालय, नाशिक), भावेश पाटील (प्रताप महाविद्यालय, अमळनेर), वैभव महाजन (अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर) अशी अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांची नावे आहेत. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. सायली आचार्य, प्रा. देवीदास गिरी, उपेंद्र वैद्य आणि यशश्री रहाळकर यांनी काम पाहिले.

प्रायोजक.. ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ ही स्पर्धा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, कोल्हापूर अशा आठ केंद्रांवर होणार आहे. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ असून या स्पर्धेचे बँकिंग पार्टनर ‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’ हे आहेत. नॉलेज पार्टनर चेतनाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च हे आहेत.